अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध चेअरमपदी शेख उमर फारूक व्हाईस चेअरमनपदी मोहम्मद मुजम्मिल खतीब तर सचिवपदी शेख रिजवान यांची बिनविरोध निवड
अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
चेअरमपदी शेख उमर फारूक व्हाईस चेअरमनपदी मोहम्मद मुजम्मिल खतीब तर सचिवपदी शेख रिजवान यांची बिनविरोध निवड
अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यात गेल्या वीस वर्षापासून जनसामान्यांच्या व तळागाळातील लोकांच्या सेवेत सदैव अहोरात्रपणे सहकार्य व मदत करणाऱ्या अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. गेल्या 20 वर्षातील कामाचा लेखाजोखा मतदार सभासद बांधवांना भावल्यानंतर अशा पतसंस्थेची निवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला आणि पतसंस्थेची निवडणूक ही बिनविरोध पार पडली. त्यानंतर पदाधिकारी निवडीची बैठक पार पडली यात चेअरमनपदी पुन्हा शेख उमर फारूक सर, व्हाईस चेअरमनपदी मोहम्मद मुज्जमिल खतीब सर तर सचिवपदी शेख रिजवान सर यांची निवड बिनविरोधपणे करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व सत्कार समारंभ नुकताच पार पडला.
संपूर्ण अंबाजोगाई तालुक्यात अलखैर नागरी सहकारी पतसंस्था ही मानवतेच्या दृष्टिकोनातून काम करते आहे.सर्व जाती धर्मातील वंचित, दुर्लक्षित आणि सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांना मदत करण्याची भूमिका पतसंस्थेने आत्तापर्यंत घेतली आहे. मदत करताना त्याची जात कोणती? त्याचा पक्ष कोणता?त्याचा धर्म कोणता ? हा विचार केला नाही. फक्त तो अडचणीत आहे आणि त्याला मदत केली पाहिजे म्हणून प्रत्येकाला अडचणीच्या काळात सहकार्य करण्याचा प्रयत्न पतसंस्थेच्या माध्यमातून राहिला आहे. गेल्या वीस वर्षात अंबाजोगाई शहर व परिसरातील हजारो कुटुंबीयांना मदतीचा हात देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. पतसंस्थेने सातत्याने सामाजिक दायित्व निभावनाचा प्रयत्न केलेला आहे. सामाजिक पातळीवर ही पतसंस्था ‘अव्वल’ ठरली आहे. शिवाय वसुली असेल किंवा ठेवी असतील त्यातही ही पतसंस्था आघाडीवर आहे.मदत करणे आणि त्याची तिची उहापोह न करणे हे संस्थेने जपलेले आहे. गेल्या 20 वर्षाचा प्रवास उल्लेखनीय व कौतुकास्पद राहिलेला आहे त्या अनुषंगाने अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी पॅनल हा पूर्णतः बिनविरोध विजयी झालेला आहे. कारण पतसंस्थेचे कामकाज प्रत्येकाने जवळून पाहिले आणि अनुभवले आहे. सर्व व्यवहार हे पारदर्शक आहेत म्हणून मतदार सभासदांनी काम करणाऱ्या नेतृत्वाला विनाकारण अडकून टाकायचे नाही म्हणून पतसंस्थेची निवडणूक बिनविरोधपणे पार पडली. ज्यात विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे सर्वसाधारण गटातून शेख ऊमर फारूक मोहम्मद, खतीब मोहम्मद मुजमील नवाबुद्दिन, शेख अब्दुल सलाम मुजाहिद अब्दुल रजाक, शेख रिजवान करीम, सिद्दिकी मोहम्मद रईस शरीफुल ,उस्मानी बदरअली नजरअली महिला राखीव मधून खान परवीन सुलताना सत्तार, शेख शकीला बेगम तालेब इतर मागासवर्गीय मधून शेख अब्दुल साजिद जिलानी आदींसह इतर दोन पदे रिक्त राहिलेली आहेत. एकूणच संचालक मंडळाची निवडणूक पार पडल्यानंतर पदाधिकारी निवडीची प्रक्रिया अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्यालयात पार पडली. ज्यात चेअरमनपदी पुन्हा शेख उमर फारूक यांची,व्हॉइस चेअरमनपदी मोहम्मद मुजम्मिल खतीब सर यांची तर सचिवपदी शेख रिजवान करीम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर नूतन पदाधिकारी व संचालक मंडळ यांचा सत्कार समारंभ मौलाली पहाड दर्गाह येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक खमर गुरुजी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी उपनगराध्यक्ष व अलखैर पतसंस्थेचे मार्गदर्शक शेख रहीम भाई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांचा सत्कार पतसंस्थेच्या वतीने करण्यात आला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नूतन संचालक मंडळ व नूतन पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी शेख रहीम भाई बोलताना म्हणाले की, या पतसंस्थेने गोरगरीब व सर्वसामान्य माणसाची नड आणि गरज ओळखली व त्याला मदतीचा हात दिला.कधीही नफा तोट्याची गोळा बेरीज केली नाही. स्वच्छ मनाने प्रत्येकाच्या मदतीला धावून गेले म्हणूनच या पतसंस्थेला साक्षात अल्हाचाच आशीर्वाद असल्याचे सांगत मी आपल्या प्रत्येक उपक्रमाला माझ्या परीने सहकार्य करण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही रहीम भाई यांनी दिली. अध्यक्षीय समारोप करताना खमर गुरुजी म्हणाले की, या पतसंस्थेत कधी राजकारण शिरले नाही, पतसंस्थेने कधी जात-पात पाहिली नाही, अल्लाहने जो मार्ग व दिशा दाखवली त्याच दिशेवर ही पतसंस्था चालत आहे. वीस वर्षात खूप मोठा विक्रम करून दाखवला आहे. ही पतसंस्था आता भारताची आयडॉल बनत असल्याचे खमर गुरुजी म्हणाले तर चेअरमन शेख उमर फारूक सर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, मी व माझे सर्व सहकारी संचालक या पतसंस्थेत येत असताना सर्व मतभेद, मनातील अविचार, गरीब-श्रीमंती, उच-नीच हे सर्व उंबरठ्याच्या बाहेर ठेवून अल्लाहाच्या या पाक मंदिरात प्रवेश करतो आणि प्रार्थना करतो की, या पदाचा वापर हा फक्त मानव कल्याणासाठीच होऊ दे, काही एक दुसरा विचार येऊ देऊ नकोस. पतसंस्थेने वीस वर्षात जनसामान्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. जे पायी चालत होते त्यांना मोटरसायकल दिली,जे मोटरसायकल चालवत होते त्यांना मोठी गाडी दिली, शिवाय ज्यांचे छोटे-मोठे व्यवसाय होते त्यांचे जीवनमान बदलण्याचा पतसंस्थेने प्रयत्न केला. गेल्या पाच वर्षात पतसंस्थेने स्वतःची मालकीची जागा घेत त्यावर आकर्षक बांधकाम व इमारत उभी केली.येणाऱ्या पाच वर्षात कार्यालयावर दुसरा मजला व इतर महत्त्वपूर्ण कामे करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे शेख उमर फारूक यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख रिजवान यांनी केले तर या ठिकाणी नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाचा सत्कार उपस्थित सभासद, हितचिंतक,आप्तेष्ट, नातेवाईक यांनी केला.
पिग्मी कर्मचारी बदरअली उस्मान यांचा सेवा गौरव आणि दिली बढती
पतसंस्थेच्या पहिल्या दिवसापासून ज्यांनी पिग्मी कर्मचारी म्हणून काम केले आणि पतसंस्थेच्या उभारणीत सर्वात महत्त्वाचा वाटा राहिलेले बदर आली उस्मानी यांचा मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव करण्यात आला. ज्यामध्ये 25 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, बुके देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच त्यांचा यथोचित सन्मान म्हणून त्यांना पतसंस्थेच्या संचालक मंडळात स्थान देण्यात आले आहे.हा आगळावेगळा व अनोखा सोहळा पाहण्याचा व अनुभवण्याचा योग उपस्थित मान्यवरांना आला.
