धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवटांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? हत्या कि आत्महत्या
धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवटांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? हत्या कि आत्महत्या
पुणे
राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना हाताशी धरुन अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा ठपका असणारे राजेंद्र घनवट यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली असून त्यांनी आत्महत्या केली कि त्यांची हत्या करण्यात आली या बाबत अनेक तर्क वितर्क केले जात आहेत.
46 वर्षीय मनाली राजेंद्र घनवट यांनी सोमवारी पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मात्र, त्यापूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. मनाली राजेंद्र घनवट यांचा मृत्यू नैसर्गिक नसून ती आत्महत्या असल्याचा संशय अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानिमित्ताने धनंजय मुंडे आणखी एका वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
राजेंद्र उर्फ राज घनवट हे धनंजय मुंडे यांचे व्यावसायिक भागीदार असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी केला होता. आपण कोणताही दावा करत नाही. परंतु अफवा आहेत की मनाली राजेंद्र घनवट यांनी आत्महत्या केली आहे. मात्र, घनवट कुटुंब त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणाचा तपास करणार का, हे बघावे लागेल.
अंजली दमानिया यांनी एक्स पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
खूप खूप धक्कादायक ! राज घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीच्या आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. राज घनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत, ह्याच राज घनवट ने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत, व याच जमिनीच्या चौकशीची मागणी, मी महसूल मंत्री बावणकुळे यांच्या कडे केली होती. ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे.
