अंबाजोगाईतील सकलेश्वर मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश; मंदिराचे जतन आणि संवर्धन होणार
अंबाजोगाईतील सकलेश्वर मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित
आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश; मंदिराचे जतन आणि संवर्धन होणार
अंबाजोगाई : महाराष्ट्र शासनाने अंबाजोगाई येथील ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर (बाराखांबी मंदिर) हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे या ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धन आणि संरक्षणास चालना मिळणार असून पर्यटनासही चालना मिळणार आहे. केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी सकलेश्वर मंदिरास संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळविण्यासाठी सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरवा केला होता. त्यांच्या मागणीला सकारत्मक प्रतिसाद देत राज्य शासनाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
अंबाजोगाई येथील सकलेश्वर मंदिर १२व्या शतकातील यादवकालीन स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण मानले जाते. या मंदिराच्या परिसरात इतर पाच मंदिरांचे पुरावशेष व जवळपास ११८ प्राचीन शिल्पावशेष आढळले आहेत. तसेच, मंदिराच्या सभोवताली मजबूत बारा खांब असल्यामुळे त्याला ‘बाराखांबी मंदिर’ असेही संबोधले जाते. हे मंदिर अद्वितीय असून आपल्या स्वरूपातील मराठवाड्यातील एकमेव असे मंदिर असल्याचे राज्य शासनाने नमूद केले आहे. या मंदिराला ऐतिहासिक, स्थापत्य, धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक भगवान शंकराच्या दर्शनासाठी येतात. शिवरात्री, श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला येथे विशेष पूजेचे आयोजन केले जाते. अंबाजोगाईतील या प्राचीन वैभवाचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेत आ. नमिता मुंदडा यांनी सकलेश्वर मंदिरास राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी या संदर्भात शासनाला पत्रव्यवहार करून मंदिराच्या ऐतिहासिक महत्त्वावर भर दिला आणि संवर्धनाची मागणी केली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्त्वीय स्थळे आणि अवशेष अधिनियम, १९६० अन्वये सकलेश्वर मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार सकलेश्वर मंदिराचा ९,७३७ चौ. मीटर परिसर संरक्षित करण्यात आला असून त्यापैकी १९२ चौ. मीटर हे संरक्षित स्मारक क्षेत्र असणार आहे. यानिमित्ताने अंबाजोगाईचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आ. मुंदडा यांनी आभार मानले आहेत. दरम्यान, सकलेश्वर मंदिराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्याने स्थानिक नागरिक, भाविक आणि इतिहासप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मंदिराच्या संरक्षणासाठी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. या निर्णयामुळे मंदिराचे जतन आणि संवर्धन होणार असून, भविष्यात पर्यटन क्षेत्रातही मोठी भर पडणार आहे. मूळच्या आर्किटेक्ट असणाऱ्या आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे शक्य झालेला हा निर्णय सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
