महिलेनं युसुफ वडगाव पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली
महिलेनं युसुफ वडगाव पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली
केज (प्रतिनिधी)
एकीकडे बीडमधील गुन्हेगारीचा वाढता आलेख समोर येत असतानाच बीडमधील गुन्हेगारीची नवनवी प्रकरणे दररोज समोर येत आहेत. बीडच्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्याबाहेर आज एका महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मात्र, एका महिलेनं संतप्त होऊन पोलीस ठाण्यासमोरच अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतल्याने आता हे प्रकरण काय असा सवाल उपस्थित झाला आहे. तर, इथेही पोलिसांकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब समोर आली आहे.
संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर आल्या असून बीडच्या पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेत गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये, मारहाण केल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाल्याचं
पाहायला मिळालं. बीडच्या शिरुर कासार येथील खोक्याभाईच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे बीडच्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्याबाहेर आज एका महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळून नेल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली होती. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या पालकांना युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. मात्र, एक महिना उलटला असला तरी यात हलगर्जीपणा होत असल्याने संतप्त झालेल्या पीडित आईने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टाळला आहे. दरम्यान, या प्रकरणाची अधिक माहिती पोलिसांकडून घेतली जात असून पुढील प्रक्रिया केली जाते आहे.
