वाळू माफियांना चाप लावण्या साठी जिल्हाधिकाऱ्यांचा दणका ४० हायवा चालकांना ठोठावला १५० कोटींचा दंड
वाळू माफियांना चाप लावण्या साठी जिल्हाधिकाऱ्यांचा दणका ४० हायवा चालकांना ठोठावला १५० कोटींचा दंड
बीड (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातील एकही ठेका दिलेला नसताना हजारो ब्रास वाळूची वाहतूक झाल्याचे पाडळशिंगी (ता. गेवराई) येथील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आल्या नंतर ४० टिप्पर मालकांना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी तब्बल ३ हजार ३०० नोटिसा बजावून वाळू माफियांनी केलेले खुलासे अमान्य केल्यानंतर तब्बल १५० कोटी रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.
ही दंडाची रक्कम संबंधित वाळू माफियांच्या मालमत्तांवर बोजा म्हणून नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बहुतांशी टिप्पर मालक बीड व गेवराई तालुक्यातील आहेत. बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, गेवराईचे तहसीलदार खोमणे यांनी संबंधित तलाठ्यांना याबाबत पत्र दिले असून बोजा चढविण्याचे आदेश त्यात आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, वाळू माफियागिरी, अवैध शस्त्रे, शेकडो शस्त्र परवाने तसेच परळीतील राख माफियागिरी चव्हाट्यावर आली. यानंतर जिल्हाधिकारी पाठक यांनी या वाळू वाहतुकीचे पाडळशिंगी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
४० माफियांना दंडाची नोटीस बजावली. याविरोधात हायवा मालक न्यायालयात गेल्यानंतर पुन्हा नव्याने नोटिसा बजावून ही प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यात आली. गौण खनिजाचा ट्रॉन्झिट पास व जीपीएस यंत्रणेचे अभिलेख, फास्ट टॅग स्टेटमेंट सादर करण्यासाठी जानेवारी महिन्यात निर्देशित केले होते. त्यानंतर या टिप्पर मालकांनी आपले खुलासे सादर केले असून आपण दिलेली नोटीस मुदतबाह्य आहे, नोटीससोबत कोणतेही ठोस पुरावे नाहीत, सीसीटीव्ही फुटेज दिले नाहीत, टोलनाक्यावर राष्ट्रीय मार्ग पोलिस कर्मचारी असतानाही त्यांनी कारवाई केली नाही, यासह इतर मुद्दे मांडून टिप्पर मालकांनी खुलासा सादर केला होता. तो अमान्य करीत जिल्हाधिकाऱ्यांनी जेवढ्या फेऱ्या तेवढ्या नोटिसा या आधारावर ४० टिप्पर मालकांना तीन हजार ३०० नोटिसा पाठविल्या. प्रत्येक फेरीस चार लाख ५७ हजारांप्रमाणे ३ हजार ३०० फेऱ्यांसाठी १५० कोटी रुपये दंड ठोठावला. आता या दंडाच्या रकमा वाळू माफियांच्या स्थावर मालमत्तांवर बोजा म्हणून नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
काहींना तीन, चार कोटींचा दंड
वाळूमाफियांनी अवैध वाळू उपसा, वाहतूक करून कोट्यवधी कमावले. आता त्यांच्या मालमत्तांवरही कोट्यवधी रुपयांच्या दंडाची रक्कम बोजा म्हणून नोंदण्यात येणार आहे. काही हायवा मालकांना तीन कोटी तर कोणाला चार कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार दंड वसुलीसाठी ही रक्कम बोजा म्हणून संबंधितांच्या स्थावर मालमत्तांवर नोंदविण्यात येत आहे. दंड वसुलीसाठी सर्व कायदेशीर मार्ग अवलंबण्यात येत आहेत.
– अविनाश पाठक, जिल्हाधिकारी, बीड
