योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने बनवल्या गेलेल्या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या तारांगण प्रकल्पाचे 28 फेब्रुवारी रोजी उद्घाटन
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने बनवल्या गेलेल्या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या तारांगण प्रकल्पाचे 28 फेब्रुवारी रोजी उद्घाटन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमिताने दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता श्री योगेश्वरी शिक्षण संस्था अंबाजोगाई संचालित पू. बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्रांचे मराठवाड्यातील सर्वात मोठ्या तारांगण प्रकल्पाचे उद्घाटन प्रसिद्ध खगोलतज्ञ श्री हेमंत मोने आणि श्री एल के कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न होत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
या वेळी उपाध्यक्ष गणपत व्यास, सचिव कमलाकर चौसाळकर, ज्येष्ठ सल्लगार प्रा माणिक लोमटे, संचालक अंगद कराड, ज्येष्ठ पत्रकार प्रा नानासाहेब गाठाल, कृ. पु. चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमण देशपांडे यांची उपस्थिती होती.

या वेळी बोलताना चंद्रशेखर बर्दापूरकर म्हणाले की, योगेश्वरी शिक्षण संस्था ही शंभर वर्षांपासून मराठवाडयाचे शिक्षणाचे माहेरघर, महत्वाचे शिक्षण केंद्र म्हणून ओळखली जाते. ग्रामीण भागात विज्ञान प्रसाराचे कार्य करण्यासाठी आणि शिक्षणासोबतच वैज्ञानिक दृष्टीकोन, विज्ञानवादाचे मूल्य रुजवण्यासाठी योगेश्वरी शिक्षण संस्थेने पू. बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्र आणि भव्य तारांगण या प्रकल्पांची सुरुवात केली आहे. डॉ सुरेश खुरसाळे सरांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या या तारांगण प्रकल्पाचे दिनांक 28 फेब्रुवारी रोजी उद्घाटन होत आहे.
ग्रामीण भागातील शासकीय व खाजगी शाळेतील कोणत्याही वयोगटाच्या विद्यार्थ्याला स्वतःच्या अभ्यासक्रमातले आणि इतर शक्य असलेले विज्ञान प्रयोग प्रत्यक्ष करून पाहता यावे, अथवा जवळून पाहता यावे अशी व्यवस्था नसते. अशी सुसज्ज व्यवस्था असणारी एखादी जागा म्हणजे विज्ञान केंद्र योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या परिसरात असावे, जिथे कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्याला सहजपणे प्रयोगाचे साहित्य आणि योग्य मार्गदर्शन मिळेल, अशी संकल्पना योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ सुरेश खुरसाळे यांनी मांडली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विज्ञान शिक्षणासाठी व ग्रामीण लोकांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी महाराष्ट्रातील अनेक विज्ञान केंद्रांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन आणि प्रत्यक्षात अनेक प्रसिद्ध वैज्ञानिक, तज्ञ व्यक्ती, विज्ञान प्रसारक संस्थांशी संवाद साधून डॉ. खुरसाळे साहेब आणि योगेश्वरी शिक्षण संस्था कार्यकारिणी मंडळाने विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. यातून संस्थेच्या परिसरात एका मोठ्या हॉलमधे पू बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्र या प्रकल्पाची सुरुवात झाली. गेली काही वर्ष विज्ञान केंद्र विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याच विज्ञान केंद्राचा महत्वाचा भाग म्हणून तारांगण प्रकल्पाची सुरुवात होत आहे.
तारांगणाची माहिती
1) आजपर्यंतचे मराठवाड्यातील व ग्रामीण भागातील सर्वात मोठे हे तारांगण असणा आहे. हे तारांगण 8 मीटर व्यासाचे असून यामधे एका वेळी 40 व्यक्ती बसू शकतात वातानुकुलीत यंत्रणेसह, उत्तम प्रकारची ध्वनी व प्रकाश यंत्रणा या तारांगणात उपलब्ध करण्यात आली आहे.
2) या तारांगणासाठी वापरण्यात आलेले Single Fish Eye Lens 3D प्रकारचे डिजीटल प्रोजेक्टर अत्यंत आधुनिक प्रकारचे असून याद्वारे विविध देशांत तयार झालेले आधुनिक खगोलशास्त्रीय कार्यक्रम/व्हिडीओ विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहेत. आकाशगंगा, यह, तारे, दीर्घिका, तारकासमूह, राशी व नक्षत्रे, ग्रहणे, अवकाशातील घडामोडी, कृत्रिम उपग्रह इत्यादी प्रचलित विज्ञान अभ्यासक्रमातील संकल्पनावर आधारित कार्यक्रम या तारांगणात विद्यार्थ्यांना पाहायला मिळतील.
3) या तारांगणात विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र विषयाशी संबंधित 50 पेक्षा जास्त प्रकारचे शो पाहायला मिळतील. मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये हे शो विद्यार्थ्यांना पाहायला मिळतील. Biography of Universe हा प्रसिद्ध शो/कायक्रम विद्यार्थ्यांना या तारांगणात पाहायला मिळणार आहे. किमान 10 मिनिटे ते 30 मिनिटे या वेळेचे शो उपलब्ध आहेत.
4) या तारांगण प्रकल्पासाठी 2.5 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला असुन कोणत्याही शासकीय मदतीशिवाय, केवळ लोकसहभागातून व माजी विद्यार्थ्यांच्या साहाय्याने पूर्ण होणारा हा एकमेव विज्ञानप्रकल्प आहे.
5) तारांगणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील खगोलशास्त्रीय संकल्पना समजून घेण्यासाठी खूप मदत होते. तारांगणाच्या मदतीने विद्यार्थ्यांमधे आकाशनिरीक्षण व खगोलशास्त्र या विषयाची आवड लागते. यातुनच त्यांची या विषयातील करियर करण्याकडे वाटचाल सुरु होते. या प्रकल्पाच्या मदतीने प्रेरणा घेऊन भविष्यात ISRO आणि NASA अशा विज्ञान संस्थांमधे म्हणून भरीव कामगिरी करणाऱ्या वैज्ञानिकांत अंबाजोगाईसह मराठवाड्याचे विद्यार्थी तयार व्हावे असा तारांगण प्रकल्प करण्यामागील संस्थेचा मानस आहे.
6) मराठवाडा विभागाच्या ग्रामीण विद्यार्थ्यांना तारांगणाचा अनुभव घेण्यासाठी मुंबई येथील नेहरू विज्ञान केंद्र, हैद्राबाद येथील बिर्ला विज्ञान केंद्र, नागपूर येथील रमण विज्ञान केंद्र, औरंगाबाद MGM संस्थेचे डॉ एपीजे अब्दुल कलाम विज्ञान केंद्र अशा ठिकाणी जावे लागते. परंतु आता बीड जिल्हयातील व मराठवाड्यातील सर्व विद्यार्थी नागरिकांना तारांगणाचा किंवा विज्ञान केंद्राचा अनुभव घेण्यासाठी पुणे मुंबई किंवा हैद्राबाद येथे जाण्याची आवश्यकता असणार नाही. अत्यंत माफक दरात तारांगणाचा विज्ञान केंद्राचा अनुभव विद्यार्थी घेऊ शकतील.
पू. बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्राच्या या प्रकल्पात तारांगणासोबत पुढीलप्रमाणे विविध उपक्रम चालतात.
मुक्तांगण उपक्रम
या उपक्रमात दर रविवारी सकाळी 9.30 ते 11 वेळेत विज्ञान समजून घेण्याची आणि काहीतरी नवीन शिकण्याची आवड असलेले जिज्ञासू विद्यार्थी आणि या उपक्रमात आवड असणारे शिक्षक एकत्र येतात. चर्चा, संवाद, प्रश्नोतरे, प्रत्यक्ष प्रयोग, निरीक्षण अशा विविध पद्धतींचा वापर करत अनौपचारिक पद्धतीने विज्ञान समजून घ्यायचा प्रयत्न केला जातो. हा उपक्रम अनेक वर्षांपासून सुरु आहे.
विज्ञानप्रयोग प्रदर्शनी
ग्रामीण शाळातील विद्यार्थी विज्ञानाचे प्रयोग प्रत्यक्ष करून पाहू शकतील, प्रयोगामागील विज्ञान समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष कृती करतील अशी व्यवस्था मोठ्या सभागृहात करून ठेवण्यात आली आहे. महत्वाच्या विज्ञान संकल्पना समजण्यासाठी विविध विज्ञान संकल्पनावर आधारित मॉडेल्सचे प्रदर्शन करून ठेवण्यात आलेले आहे.
शनिवार विज्ञानवारी
मराठी विज्ञान परिषद मुंबई या संस्थेच्या सहकार्याने शनिवारी विज्ञानवारी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात विज्ञान महाविद्यालयीन काही विद्यार्थी विज्ञानप्रयोगांचे प्रशिक्षण घेऊन साहित्य सोबत घेऊन दर शनिवारी एका शाळेमध्ये जातात. तेथील विद्यार्थ्यांना उपलब्ध साहित्यातून व टाकाऊ वस्तूंपासून विज्ञानाचे विविध मनोरंजक प्रयोग स्वतः करायला शिकवतात. यापूर्वी 20 शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला.
रोबोटिक लॅब
विद्यार्थ्यांच्या मनात रोबोटिक क्षेत्राविषयी आवड लागण्यासाठी पू. बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्राच्या या प्रकल्पात रोबोटिक लॅब या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे विविध अभ्यासक्रम राबवून विद्यार्थ्यांना रोबोटिक विषयाचे अत्याधुनिक ज्ञान दिले जाईल.
फिरते विज्ञान प्रदर्शन
मुंबई येथील नेहरू विज्ञान केंद्र यांच्या मदतीने फिरते विज्ञान प्रदर्शन हा उपक्रम जुलै-2024 महिन्यात अंबाजोगाई शहर व परिसरात घेण्यात आला. स्वच्छतेच्या संदर्भात महत्व सांगणारी व माहिती देणारी एक बस प्रात्यक्षिक प्रयोग व प्रदर्शने यासह
अंबाजोगाई शहरातील व परिसरातील ग्रामीण भागातील 45 शाळांतील 15000 विदयार्थ्यांपर्यंत पोचवण्यात आली.
विद्यार्थी-शिक्षक विज्ञान प्रशिक्षणे
पपू बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्राच्या वतीने विज्ञानाशी संबंधीत अनेक विषयाच्या संदर्भात विविध प्रशिक्षण घेण्यात येतात. विज्ञान खेळण्यां, खगोलशास्त्र, दुर्बिणी, याबाबत शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षणे घेण्यात आलेली आहेत.
खगोलशास्त्र आणि आकाशनिरिक्षण
विद्यार्थ्यांची खगोलशास्त्रातील आवड व जिज्ञासा वाढवण्यासाठी विज्ञान केंद्राच्या वतीने आकाश निरिक्षण हा उपक्रम सातत्यपूर्ण घेतला जातो. दुर्बीणींचा वापर करून ग्रहांची निरिक्षणे करणे, ग्रहणे, उल्कापात, अधिक्रमणे अशा महत्वाच्या खगोलीय घटनांचे प्रत्यक्ष अनुभव देणे, टेलिस्कोप बनवण्याच्या विदयार्थ्यांच्या कार्यशाळा आयोजित करणे, अशा अनेक उपक्रमांव्दारे खगोलशास्त्रात विद्यार्थ्यांची रुची वाढवण्याचे प्रयत्न केले जातात. विज्ञान केंद्राच्या वतीने प्रत्येक वर्षातून किमान एक वेळा दुर्बीणीच्या संदर्भात कार्यशाळा घेतली जाते. आजपर्यंत 22 शाळांना आणि अनेक विद्यार्थ्यांना दुर्बीणी बनवण्यासाठी/खरेदी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
विज्ञानप्रयोग प्रशिक्षण
हसतखेळत विज्ञान किंवा टाकाऊ वस्तुतून विज्ञानाचे प्रयोग शिकवणे हा उपक्रम विज्ञान केंद्राचा वतीने अनेक वेळा घेण्यात आलेला आहे. मराठी विज्ञान परिषदेचे विज्ञान प्रसारक जयंत जोशी, जळगाव येथील विज्ञान प्रसारक प्रा. दिलीप भारंबे आणि प्रा. पाटील सर यांच्या मार्गदर्शनात विज्ञानाचे मनोरंजक प्रयोगांची कार्यशाळा अनेक वेळा घेण्यात आली.
अंबाजोगाई हे एक महत्वाचे ऐतिहासीक, सांस्कृतिक व पर्यटनाचे स्थळ आहे. येथील प्रेक्षणीय पर्यटन स्थळांमध्ये आता भव्य तारांगण असलेले पपू बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्र हेही एक विज्ञान पर्यटन स्थळ असेल. अंबाजोगाईत येणाऱ्या प्रत्येकासाठी आणि परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे विज्ञान केंद्र आणि तारांगण म्हणजे आकर्षणाचे केंद्र असेल. यामुळे हे विज्ञान केंद्र आणि तारांगण हे मराठवाड्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी फक्त मनोरंजनाचे, सहलीचे नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या ज्ञानविज्ञानाच्या, संशोधनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी फार महत्त्वाचे केंद्र असणार आहे.
