ताज्या घडामोडी

*शासन निर्णयानुसार परिचर्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी यासाठी स्वा रा ती च्या परिचरिकांचे काम बंद आंदोलन*

*शासन निर्णयानुसार परिचर्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी यासाठी स्वा रा ती च्या परिचरिकांचे काम बंद आंदोलन*

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दि ३१.१२.२०२४ रोजी सन २०२४-२०२५ निवड सूची वर्षात पदोन्नती कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत परिपत्रके काढले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री महोदयांनी १०० दिवसाच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची पदोन्नतीची कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत निर्देश दिले आहेत.परंतु वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे सेवा प्रवेश नियम मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्या कारणामुळे परिचर्या संवर्गातील सर्वंकष पदांची पदोन्नती मागील अनेक वर्षांपासून रखडलेली आहे.या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी दि २० रोजी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. या काम बंद आंदोलनात स्वा रा ती चे सर्व परिचारक तथा परिचारिका सहभागी झाले होते.
पाठ्यनिर्देशिका तसेच विभागीय परिसेविका, सार्वजनिक आरोग्य निर्देशिका, सहाय्यक अधिसेविका, अधिसेविका या पदांची देखील पदोत्रती रखडलेली आहे.
पदोन्नती या सेवाजेष्ठतेच्या आधारेच करावी अशी संघटनेची आग्रही भूमिका आहे.संघटनेतर्फे अनेक वर्षांपासून या पदाच्या पदोन्नतीसाठी पत्रव्यवहार तसाच बैठकीद्वारे चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयन केलेला असूनही सदर पदोन्नत्या प्रलंबितच आहेत. त्यामुळे परिचर्या संवर्गामध्ये संतप्त भावना निर्माण झालेल्या आहेत. अखेर परिचारिकांना न्याय देण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला असून
दि. २०.०२.२०२५ रोजी एक दिवसाचे काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते.
परिचर्या संवर्गाच्या सर्वंकष पदोन्नती ही महत्त्वाची मागणी आहेच तसेच परिचारिकांना मिळणारे भत्ते विशेषतः परिचर्या भत्ता, ग्रामीण रुग्णालयातील परिसेविका पद पुनर्जीवित करणे, बंधपत्रित परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करणे, बक्षी समिती खंड-२ मध्ये परिचर्या संवर्गावर झालेला अन्याय दूर करणे, परिविक्षा कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून अधिपरिचारिका पद वगळावे या आणि इतर देखील अनेक मागण्या आहेत. परीचार्यांनी पुकारलेल्या एक दिवसीय काम बंद आंदोलनाची दखल शासनाने न घेतल्यास यानंतर बेमुदत संपाचा आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल अशी भावना या आंदोलन प्रसंगी परीचारकांनी व्यक्त केली आहे. या काम बंद आंदोलनात महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सिंग फेडरेशन संलग्न परिचारिका सेवा संघ अंबाजोगाईच्या अध्यक्षा श्रीमती चित्ररेखा बांगर सचिव श्रीमती रागिनी पवार कार्याध्यक्ष मंगेश सुरवसे उपाध्यक्ष राम फड यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी श्रीमती आशा माने अशोक मोराळे ,मनोज जरांगे, नीता घोडके ,वर्षा ठाकूर यांच्यासह सर्वांनी मिळून हे आंदोलन यशस्वीपणे पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!