हृदयविकाराचा झटक्याने अंबाजोगाई तालुक्यातील रहिवासी व देवरुख आगाराच्या वाहकाचा चालत्या बस मध्ये मृत्यू
हृदयविकाराचा झटक्याने अंबाजोगाई तालुक्यातील रहिवासी व देवरुख आगाराच्या वाहकाचा चालत्या बस मध्ये मृत्यू
देवरुख (प्रतिनिधी)
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंबाजोगाई तालुक्यातील जोडवाडी येथील रहिवासी व देवरुख आगारात कार्यरत असलेले तुकाराम कुंडलिक माने (४२) असे या वाहकाचा चालत्या बसमध्येच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी करजुवे देवरुख यादरम्यान घडली.
मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी चालक बालाजी मनोहर कोपनर आणि वाहक तुकाराम कुंडलिक माने यांनी सकाळी ११:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत संगमेश्वर ते करजुवे अशा फेऱ्या मारल्या. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते संगमेश्वर येथून करजुवे वस्तीची बस घेऊन गेले होते. बुधवारी सकाळी ६:१५ वाजता ही बस करजुवे येथून प्रवासी घेऊन संगमेश्वरकडे निघाली. थोड्याच अंतरावर भायजेवाडी मार्गे घारेवाडी येथे वाहक तुकाराम माने चक्कर येऊन खाली पडल्याचे एका प्रवाशाने बसचालकाला सांगितले.
चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी करून तुकाराम मानेकडे विचारपूस केली. त्याने अस्वस्थ वाटत असल्याचे आणि छातीत दुखत असल्याचे सांगितले. चालक कोपनर यांनी वेळ न घालवता व प्रवाशांची मदत घेत थेट संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाकडे बस नेली. तेथे वाहकाला उपचारासाठी दाखल केले. मात्र तोवर तुकाराम याची प्राणज्योत मालवली होती.
देवरुख आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे, स्थानक प्रमुख कैलास साबळे तसेच अनेक चालकवाहकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. काही वाहक आणि चालकांना अश्रू अनावर झाले. संगमेश्वरचे परिविक्षाधीन उप अधीक्षक शिवप्रसाद पारवे, उपनिरीक्षक राजेश शेलार, उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, हेडकॉन्स्टेबल बरगळे, कॉन्स्टेबल बाबुराव कोंदल यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आसुन बीड जिल्ह्यातील तुकाराम माने हे २०१८ साली वाहक कम चालक म्हणून देवरुख आगारात रुजू झाले होते. दोन मुले आणि पत्नीसह ते देवरुखमध्ये रहात होते तर अन्य कुटुंब बीड जिल्ह्यातील मूळ गावी राहत आहे.
शव विछेदना नंतर तुकाराम माने यांचा मृतदेह त्यांच्या गावी आणण्यात आला.
