फार्मसी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर पिंपळा धायगुडा येथे संपन्न
फार्मसी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर पिंपळा धायगुडा येथे संपन्न
अंबाजोगाई(प्रतिनिधी):-
श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी फार्मसी महाविद्यालयाचे अंबाजोगाई तालुक्यातील पिंपळा धायगुडा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर दि ९ ते १५ फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाले. या साप्ताहिक सेवा योजना शीबिरात विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.
९ ते १५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान धायगुडा पिंपळा या गावात हे शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ग्रामस्वच्छता, समाजप्रबोधन, आरोग्य तपासणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पिंपळा गावकऱ्यांनी देखील मोठा उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला. गावकऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे महाविद्यालयाचे शिबिर यशस्वी झाले. शिबिराच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष तरके यांनी अशा या शिबिरांमुळे विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात वाढ होण्यास मदत होत असल्याची भावना व्यक्त केली. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वच्छता अभियान हा भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे असेही मत प्राचार्य तरके यांनी मांडले. हे अभियान विशेषतः स्वच्छ भारत मिशन (Clean India Mission) च्या उद्देशाला सहाय्यक ठरते. NSS अंतर्गत स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी केली जाते ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहित केले जाते.
ह्या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख एम. ए. कुरेशी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या महत्त्वाची जाणीव करून दिली. तसेच त्यानी विद्यार्थ्यांच्या मदतीने धायगुडा पिंपळा या गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालय आणि इतर सार्वजनिक क्षेत्र स्वच्छ केली. पर्यावरणीय साफसफाई आणि कचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाय तयार करण्यासाठी लोकांना प्रेरित केले. तसेच स्वच्छते संबंधी असणाऱ्या नियमांची ओळख व माहिती गावकऱ्यांना करवून दिली. त्याचबरोबर त्यावर कार्यवाही करत सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रीय विकासात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये एकता निर्माण केली.
या साप्ताहिक राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थ्यांनी धायगुडा पिंपळा या गावातील “जीवन आधार वृद्धाश्रम” या ठिकाणी देखील भेट दिली. यावेळी विद्यार्थांनी वृद्धाश्रमातील वृद्धांचा विरंगुळा व मनोरंजन होण्यासाठी भक्ती गीते सादर केली. सोबतच परिसारतीची स्वच्छता केली. वृद्धापकाळातील निराधार व्यक्तींसाठी असलेला हा आश्रम आश्रयस्थान असल्याचे येथील वृद्धांनी सांगितले. या दरम्यान त्यांना औषधांची माहिती दिली.
हे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख एम.ए.कुरेशी यांनीं पुढाकार घेतला व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष तरके तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
