ताज्या घडामोडी

प्रयागराजला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात, नांदेडमधील माय-लेकासह चौघांचा मृत्यू 19 जण जखमी

प्रयागराजला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात, नांदेडमधील माय-लेकासह चौघांचा मृत्यू 19 जण जखमी

नांदेड (प्रतिनिधी)

  प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यावरून अयोध्येकडे निघालेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात होउन या घटनेत चार भाविकांचा मृत्यू झाला, तर अन्य १९ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.

    उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात रविवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मयतांमध्ये नांदेड येथील तिघांचा तर हिंगोली जिल्ह्यातील एका महिलेचा समावेश आहे. सुनिल दिगंबरराव वरपडे (वय-५०) छत्रपती चौक नांदेड, अनुसया दिगंबर वरपडे (वय-८०) रा. छत्रपती चौक नांदेड, दिपक गणेश गोदले स्वामी (वय-४०) रा. छत्रपती चौक नांदेड, जयश्री कुंडलिकराव चव्हाण (वय-५०) रा. आडगाव रंजेबुवा ता. वसमत जि. हिंगोली अशी या मृत व्यक्तींची नावे आहेत.

     नांदेड येथून प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलरने २३ जण रवाना झाले होते. महाकुंभ मेळ्यात स्नान करून हे सर्व भाविक टेम्पो ट्रॅव्हलरने अयोध्येकडे निघाले होते. दरम्यान, रविवारी पहाटे पूर्वांचल एक्सप्रेस वे वर उभ्या असलेल्या एका ट्रॅव्हल्सवर भाविकांची टेम्पो ट्रॅव्हलर जावून धडकली. या भीषण अपघातात चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर उर्वरित १९ जण जखमी झाले आहेत. या चार जणांमध्ये तीन जण नांदेडचे, तर एक जण हिंगोली जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे.

    कुंभमेळ्यातील स्नानासाठी काही मंडळींनी एकत्र येवून सदरची टेम्पो ट्रॅव्हलर बुक केली होती. कुंभमेळ्याचे स्नान आटोपल्यानंतर ही मंडळी अयोध्येकडे रवाना होत होती. त्याचवेळी हा अपघात घडला. या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये २३ यात्रेकरु असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!