आ सुरेश धस आणि ना धंनजय मुंडे यांची भेट, चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं पितळचं उघड
आ सुरेश धस आणि ना धंनजय मुंडे यांची भेट, चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं पितळचं उघड
मुंबई (प्रतिनिधी)
संतोष देशमुख हत्याप्रकरणात ज्यांनी धनंजय मुंडेंवर एकापाठोपाठ एक गंभीर आरोप केले. त्यांच्या विरोधात रान पेटवलं. आता त्याच धस आणि मुंडे यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली. पण काही क्षणातच धनंजय मुंडेंच्या कार्यालयानं अशी कोणतीही भेट झाली नसल्याचा खुलासा केला. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सुरेश धस यांच्या वेगवेगळ्या दाव्यानं मुंडेंच्या कार्यालयाचा दावा काहीच वेळात खोट असल्याचा उघडं झालं आहे.
भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीचं वृत्त दाखवण्यात आल्यानंतर काहीच वेळात मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयानं हे वृत्त फेटाळून लावलं होतं.यावेळी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये कोणतीही भेट झालेली नाही, असं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं होतं. पण त्यानंतर काही क्षणातच भाजप प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांच्या निवासस्थानी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यासोबत साडेचार तासांची बैठक झाली होती,अशी कबुली दिली.
या भेटीवर बावनकुळे म्हणाले,आम्ही चार साडेचार तास एकत्र होतो.सुरेश धस आणि धनंजय मुंडे दोघेही होते.दोघांमध्ये मतभेद आहेत,मनभेद नाहीत.दोघेही इमोशनल आहेत.दोघांमध्ये थोडे मतभेद आहेत, ते दूर होतील. माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो,काळ मतभेद दूर करतो.लवकरच मुंडे आणि धस यांच्यातील मतभेद दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष असून माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केलं आहे.त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारीक भेट झाली आहे.आम्ही तिघेही परिवार म्हणून बसल्याची माहिती बावनकुळेंनी यावेळी दिली.
तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी शुक्रवारी (ता.14) माध्यमांशी संवाद साधला. धसांनी यावेळी धनंजय मुंडेंसोबत माझ्या दोन भेट झाल्याचे मान्य केले. एक भेट 15 ते 20 दिवसांपूर्वी झाली. बावनकुळेंच्या निवासस्थानी मला जेवायला भेटायला बोलावलं होतं. त्यावेळी तिथं धनंजय मुंडे येणार असल्याची कल्पना नव्हती. पण ते मी दाखल झाल्यावर काहीवेळानं तेही तिथं आले. त्यावेळी बावनकुळेंनी तुमच्यात मतभेद आहे.ते काही मिटेल का असं विचारलं.पण मी नाही म्हटलं. त्यानंतर मुंडे आणि मी तिथून निघून गेलो, असंही धस यांनी सांगितलं.
तसेच धनंजय मुंडेंचं ऑपरेशन झाल्यावर मी त्यांना भेटलो. मी केवळ त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो.रात्री त्यांना त्रास झाल्यामुळे दत्तात्रय भरणेमामांनी त्यांना दवाखान्यात दाखल केलं होतं.काल मी माणुसकीच्या नात्यानं धनंजय मुंडेंना भेटलो.या भेटीवेळी त्यांनी माझा या हत्याप्रकरणात काहीही संबंध नसल्याचं मुंडेंनी सांगितलं. पण मी त्यांना तुमचा या प्रकरणात हात आहे की नाही, किंवा संबंध आहे की नाही हे तपासात समोर येईनच असं सांगितलं.मी धनंजय मुंडेंना भेटलो असलो तरी माझा लढा सुरूच राहणार असल्याचंही धस यांनी ठणकावून सांगितलं.
सुरेश धस अडकला पाहिजे असं प्लॅनिंग सुरु असल्याचं सध्या दिसून येत आहे.तुम्ही भेटून आल्याची बातमी लीक करत असाल तर मग अवघड आहे. शंका उपस्थित होईल अशा बातम्या पेरल्या जात आहेत. पण मी संतोष देशमुख सोबतच राहणार आहे. मनोज जरांगेंचा गैरसमज झाला असेल तर त्यांची भेट घेऊन तो दूर करेन असंही त्यांनी यावेळी म्हटलं. तसेच देशमुखांच्या पत्नीलाही नोकरीची ऑर्डर काढून प्रलोभन दाखवण्यात येत असल्याचा आरोपही धस यांनी यावेळी केला.
