केजरीवालांच्या पराभवानंतर संजय राऊतांचा ‘इंडिया आघाडी’ला सल्ला 10 वर्ष झोपलेल्या अण्णा हजारेंचा घेतला समाचार
केजरीवालांच्या पराभवानंतर संजय राऊतांचा ‘इंडिया आघाडी’ला सल्ला 10 वर्ष झोपलेल्या अण्णा हजारेंचा घेतला समाचार
मुंबई (प्रतिनिधी)
दिल्ली मधे केजरीवाल यांचा पराभव व भाजपने मिळवलेल्या यशा नंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी इंडिया आघाडीला सल्ला देऊन 10 वर्ष झोपलेल्या आण्णा हजारे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
लोकशाहीत निवडणुका होत असतात. जय-पराजय होत असते. पण, गेल्या १० वर्षांपासून भाजप निवडणुकीत उतरल्यापासून निवडणुका लोकशाही पद्धतीने लढल्या जात नाहीत. त्या सैतानी किंवा हैवाणी पद्धतीने लढल्या जात आहेत साम-दाम-दंड-भेट सगळ्या गोष्टींचा निवडणुका जिंकण्यासाठी वापर केला जात आहो. मतदार याद्यांचा घोळ महाराट्रासारखाच दिल्ली आणि हरयाणात दिसला. हाच पॅटर्न बिहारमध्ये दिसेल. पराभूत झाल्यानंतर बाऊ न करता, पुढील लढाईसाठी एकत्र आले पाहिजे, असा सल्ला शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी ‘इंडिया आघाडी’तील विरोधी पक्षांना दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हणाले, “काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते, तर निकाल वेगळा लागला असता. नाहीतर केंद्र आणि राज्यात एकतर्फी जे चालले आहे, त्याला आपण मान्यता दिली पाहिजे. त्यात देश, राज्य टिकेल का? विरोधी पक्षाचा आवाज राहिला का? याचा विचार करण्याची गरज आली आहे.”
संजय राऊत यांनी घेतला आण्णा हजारेचा समाचार
.अरविंद केजरीवाल यांनी मद्य धोरणावर लक्ष केंद्रीत केले. त्यांच्या डोक्यात पैशांची आणि सत्तेची हवा गेली. त्यामुळे केजरीवाल यांचा पराभव झाला, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिली होती. यावरून संजय राऊत यांनी अण्णांचा समाचार घेतला आहे.
“अण्णा हजारे काय बोलतात, त्याला अर्थ राहिला नाही. अण्णा अचानक जागे होतात. मोदी काळात भ्रष्टाचार झाला, लोकशाहीत हल्ले झाल्यावर तेव्हा अण्णा हजारे काहीही बोलले नाहीत. दिल्लीतील केजरीवालांच्या पराभवानंतर अण्णांना आनंद झाला आहे. हे अत्यंत दुखद आहे. हे लोकशाहीला मारक आहे. केजरीवाल आणि हजारे यांनी एकत्र आंदोलन उभे केले होते. त्यातून अण्णा देशाला माहिती झाले. देश लुटला आणि विकला जातोय. एकाच उद्योगपतीच्या घशात सार्वजनिक संपत्ती घातली जाती आहे. भ्रष्टाचारांना भाजपमध्ये पवित्र करून घेतले जात आहे. अण्णांनी त्यावर आपले मत व्यक्त करावे, असं वाटत नाही. यामागील रहस्य काय?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
” केजरीवाल यांनी पराभव स्वीकारला आहे. केजरीवाल पराभूत झाल्याचा आनंद काँग्रेसला सुद्धा झाला असेल, तर मला त्याचे दु:ख वाटत आहे. केजरीवाल यांचा पराभव झाला असला, तरी भाजप, नरेंद्र मोदी आणि अमित शहा विजयी झाले आहेत. यांनीच लोकशाहीचा खड्डा खांदलेला आहे,” असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.
