स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून युवकांनो जग जिंका – सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले
स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून युवकांनो जग जिंका – सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
युवकांनी सतत स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणत स्वतःला ‘ट्रान्सफॉर्ममेशन ‘ प्रक्रियेत ठेवले पाहिजे तरच त्यांच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडून येऊन ते जीवनात आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत ते ध्येय मिळवू शकतात, जग जिंकू शकतात असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा इंडीयन मेडीकल असोसिएशनचे सांस्कृतिक राज्य प्रमुख डॉ.राजेश इंगोले यांनी केले.
योगेश्वरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप प्रसंगी ते प्रमुख व्याख्याता म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव कमलाकरराव चौसाळकर, संचालक अंगदराव कराड , प्राचार्य एम.व्ही. कानेटकर, उपप्राचार्य आर.व्ही.कुलकर्णी, प्रा.मेजर एस.पी.कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ.राजेश इंगोले यांनी, युवा वर्गाने आपल्या व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व या दोन गोष्टींकडे विशेषत्वाने लक्ष दिले पाहिजे असे सांगून या गोष्टीं जीवनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत असे सांगितले. स्वतःमध्ये बदल करीत राहणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रत्येक चांगली गोष्ट आत्मसात करून आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये त्या गोष्टीचा समावेश करणे म्हणजेच स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करणे आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन एका रात्रीत होत नसते तर त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. युवा वर्गाने आपल्या जीवनात ही प्रक्रिया सतत गतिमान केली पाहिजे. युवकांनी अंधश्रद्धा बाजूला सारून विज्ञानवाद स्वीकारला पाहिजे, दैववाद सोडून कर्मवाद स्वीकारला पाहिजे, समाजामध्ये समाज बदलेल ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा प्रथम मी स्वतःला बदलेल आणि त्यानंतर माझ्या कुटुंबाला बदलेल त्यानंतर समाजाला बदलण्याचा प्रयत्न करेल असे जर ठरविले तर भारत देशाला महासत्ता बनविण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. युवकांनी आपल्याला व्यसनांपासून दूर ठेवले पाहिजे. कारण, व्यसने ही मानवी जीवनाला लागलेला शाप आहे .व्यसनांमुळे आपली, स्वतःची तसेच आपल्या कुटुंबीयांची अधोगती होते. त्यामुळे युवा वर्गाने दारू, गांजा, तंबाखू, गुटखा, मादक द्रव्य मादक औषधे यापासून कोसो दूर राहिले पाहिजे असे आवाहन डॉ.इंगोले यांनी केले. या शिबिरांमधून विद्यार्थ्यांमधल्या विविध कौशल्यांना तसेच नेतृत्वगुणांना वाव मिळतो. त्यामुळे महाविद्यालयांनी अशी शिबिरे सतत ठेवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन ही डॉ.राजेश इंगोले यांनी केले. अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर यांनी योगेश्वरी महाविद्यालयाचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्थेचे नांव उज्ज्वल करीत आहेत. त्यांची ही गौरवशाली परंपरा प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या परीने पुढे नेण्याचा प्रयत्न करावा महाविद्यालय संपूर्ण ताकदीने विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये यश मिळविण्यासाठी आपला तसाच महाविद्यालयाचा नांवलौकीक करण्यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे असे यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मारूती कानेटकर यांनी केले तसेच उपप्राचार्य आर.व्ही.कुलकर्णी व प्रा.मेजर एस.पी.कुलकर्णी यांनी प्रासंगिक मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनचे कार्यक्रमाधिकारी डॉ.महेंद्र आचार्य यांनी अहवाल वाचन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.महेंद्र आचार्य व डॉ.एस.डी.घन यांनी प्रयत्न केले.
=======================
=======================
