तुझ्या भावाने माझ्यावर केस का केली म्हणून डोळ्यात मिरची पावडर टाकत कात्रीनं केले सपासप वार
तुझ्या भावाने माझ्यावर केस का केली म्हणून डोळ्यात मिरची पावडर टाकत कात्रीनं केले सपासप वार
बीड (प्रतिनिधी)
तुझ्या भावाने माझ्यावर केस का केली या कारणावरून डोळ्यात मिरची पावडर टाकत कात्रीनं जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथे घडली
अनिल आत्माराम गायके असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. तुझ्या भावाने माझ्यावर केस का केली? असा जाब विचारत डोळ्यात मिरची पावडर टाकून कात्रीने हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल गायके हा तरुण लोणगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून घरी चालत जात होता. यादरम्यान, सोनकांबळे यांच्या किराणा दुकानासमोर गावातीलच आरोपी गोपाळ पांडुरंग राऊत याने हातातील मोबाईल फोन हिसकावून घेत मोबाईल जमिनीवर फोडला. नंतर मिरची पावडर त्याच्या डोळ्यात टाकली आणि कात्रीने त्याच्या छातीवर सपासप वार केले.
या हल्ल्यात अनिल गायके याने आरडाओरडा केला. अनिल गायकेचा आवाज ऐकताच त्याचा भाऊ ज्ञानेश्वर गायके पळत आला. त्याच्याही मानेवर राऊत याने कात्रीने वार केले. त्यानंतर रस्त्यावरील लोकांनी त्या ठिकाणी धाव घेत गायके भावडांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गोपाळ राऊत याने तेथून पळ काढला. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, गोपाळ राऊत याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दिंद्रुड पोलीस करीत आहेत.
