पराभूत होताच पैलवान शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारली महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ मैदानात पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप
पराभूत होताच पैलवान शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारली महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ मैदानात पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप
अहिल्या नगर (प्रतिनिधी )
अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागले असून पृथ्वीराज मोहोळकडून पराभूत झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षेने पंचाना लाथ मारली आणि स्पर्धेच्या ठिकाणी एकच गोंधळ झाला या वेळी पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ आली.
पंचांचा निर्णय मान्य न झाल्याने शिवराज राक्षेने हे कृत्य केलं. यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापटही झाल्याचं दिसून आलं. या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला. नंतर हे दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले.
महाराष्ट्र केसरी 2025 ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ अशी लढत झाली. ही लढत पृथ्वीराज मोहोळने जिंकली. पण शिवराज राक्षेला त्याचा पराभव मान्य झाला नव्हता. त्याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला. नंतर राग अनावर झाल्यानंतर त्यांने पंचांची कॉलर खेचली आणि लाथही मारल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं. मात्र, “माझी पाठ टेकली नव्हती,” असे स्पष्ट करत शिवराज राक्षेने आरोप फेटाळले आहेत. आता या घटनेवर महाराष्ट्र कुस्ती महासंघ काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात सामना रंगणार होता. या लढतींमध्ये महेंद्र गायकवाड यांनी मैदान मारले. त्यानंतर महाराष्ट्र केसरी किताबासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्या सामना रंगला आहे.
