तरुणासोबत लग्न करून दुसर्याच दिवशी नववधू पळाली, तरुणाला घातला 5 लाख रुपयांचा गंडा
तरुणासोबत लग्न करून दुसर्याच दिवशी नववधू पळाली, तरुणाला घातला 5 लाख रुपयांचा गंडा
जामखेड (प्रतिनिधी)
बनावट लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीचा जामखेड तालुक्यात वावर वाढला असून, या टोळीने आतापर्यंत अनेकांना चांगलाच गंडा घातला आहे. नुकतीच एका तरुणाची फसवणूक करून त्याला तब्बल 5 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.
बाबू गोरख म्हात्रे (वय 28) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव असून, लग्न करून देण्यासाठी त्याच्याकडून तब्बल 5 लाख रुपये उकळण्यात आले. बाबूच्या ओळखीचे लग्न लावून देणारे एजंट बापू काटे आणि नाना कात्रजकर या दोघांनीच त्याची फसवणूक केली. 15 जून 2024 रोजी बाबू म्हात्रे या तरुणाचे स्नेहा चव्हाण (पूर्ण नाव माहीत नाही) या मुलीसोबत लग्न लावून दिले. मात्र , लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुलीने नवरदेवाच्या घरून धूम ठोकली आणि ती फरार झाली.
अनेक दिवसांपासून बाबू म्हात्रे लग्नासाठी मुलीच्या शोधात होता. अशातच त्याला त्याच्या ओळखीचे लग्न लावून देणारे एजंट बापू काटे आणि नाना कात्रजकर हे भेटले. त्यावेळी त्यांनी लग्नासाठी पाच लाख रुपये लागतील, असे सांगण्यात आले. त्यावेळी नवरदेव बाबू म्हात्रे याच्याकडून सर्व तयारी करण्यात आली. आळंदी येथे दोघांचेही लग्न लावून देण्यात आले. मात्र, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरी मुलीने नवरदेवाच्या घरातून धूम ठोकली. लग्न आणि भावी आयुष्याची सुखस्वप्न पाहणाऱ्या बाबूने आपले लग्न लावून देण्यासाठी एजंट आणि मुलीकडच्या फसवणाऱ्या टोळीला एकूण 3 लाख 60 हजार रुपये तसेच दोन तोळे सोने दिले होते. मात्र, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरी मुलगी फरार झाली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बाबूने खर्डा पोलीस ठाण्यात नवरी मुलगी आणि तिच्यासोबत आलेल्या टोळीविरोधात फिर्याद नोंदवली. त्या आधारे खर्डा पोलिस स्टेशमध्ये दोन एजंट, मुलीसोबत आलेली एक करवरी आणि लग्न जमवून देणारी महिला अशा 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुन्हा दाखल करण्यासाठी म्हात्रे यांनी उपोषण केले होते.
