बीड मधे यापुढे नेत्यांना अंगरक्षकाचा ‘चॉईस’ नसणार- पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घेतला मोठा निर्णय
बीड मधे यापुढे नेत्यांना अंगरक्षकाचा ‘चॉईस’ नसणार-
पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घेतला मोठा निर्णय
बीड
ज्या नेत्यांना पोलिस अंगरक्षक आहेत, त्यांची निवड नेत्यांच्या मागणीनुसार झालेली असल्याने वर्षानुवर्षे एकाच नेत्याकडे अंगरक्षक राहत पर्यायाने या मंडळींना पोलिसिंगचा विसर पडून नेत्यांची हुजरेगिरी आणि त्याआडून भलते इंटरेस्टही वाढले गेले.
वाल्मीक कराडच्या प्रकरणावरून बॉडीगार्डचे प्रताप सीआयडीच्या दफ्तरापर्यंत पोचले. परंतु, आता अंगरक्षकांची नेमणूक खुद्द पोलिस अधीक्षक करणार आहेत.
यापूर्वी बीड पोलिसांनी नेत्यांच्या चॉइसनुसार आणि त्यांच्या विशिष्ट नावाच्या मागणीनुसार अंगरक्षक पुरविले आहेत. विशेष म्हणजे काही नेत्यांकडे अंगरक्षक म्हणून असलेले पोलिस वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी आहेत. कुठल्याही खात्यात आणि कोणत्याही सरकारी पदावर तीन वर्षांनी बदली होते. मग, काही अंगरक्षक १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून एकाच नेत्याकडे असल्याने त्यांना पोलिसिंगचा विसर पडून नेत्यांची कार्यकर्तेगिरी सुरू असते. यातून काहींचे भलते इंटरेस्टही समोर आले. वाल्मीक कराड गुन्हे काळात फरारी असताना अंगरक्षक सोबत असल्याचे समोर आल्याची सीआयडीने चौकशीही केली. आता अंगरक्षक नेत्यांच्या चॉइसने नाही तर पोलिस दलाच्या उपलब्धतेनुसार व रोटेशननुसार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
असे आहेत नवीन नियम
- पोलिस दलात अंगरक्षकांसाठी स्वतंत्र पथक असेल.
- त्यांचे सात दिवसांचे ड्युटीचे रोटेशन असेल.
- अंगरक्षक एका आठवड्यात एका नेत्याकडे असेल.
- तर दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या नेत्याकडे असणार आहे.
जिल्ह्यातील सध्याची स्थिती
जिल्ह्यात आमदारांना एक तर वाल्मीक कराडला दोन बॉडीगार्ड होते. सध्या सुरेश धस, विजयसिंह पंडित व नमिता मुंदडा या आमदारांना अंगरक्षक देखील नाहीत. तर अमरसिंह पंडित, भीमराव धोंडे, प्रकाश सोळंके, पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, बजरंग सोनवणे, मयत सरपंच यांचे भाऊ धनंजय देशमुख, संदीप क्षीरसागर यांच्यासह सत्र न्यायाधीश, सरकारी वकील तांदळे, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांना प्रत्येकी एकेक पोलिस अंगरक्षक आहे. तर धनंजय मुंडे, सुभाष राऊत यांना प्रत्येकी दोन अंगरक्षक आहेत.
यापूर्वी काय झाले ते सांगता येणार नाही. परंतु, यापुढे बॉडीगार्डची ड्युटी सात दिवसांच्या रोटेशनने असेल. त्यासाठी बॉडीगार्डचे स्वतंत्र पथक तयार केले जात आहे. पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.
– नवनीत कॉवत, पोलिस अधीक्षक, बीड
