ताज्या घडामोडी

तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवार यांनी खंत व्यक्त करत खंडणी खोराना दिला इशारा

तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवार यांनी खंत व्यक्त करत खंडणी खोराना दिला इशारा

बीड 

    बीड जिल्ह्याला शिस्त लावणे काळाची गरज असून जेवढी नीट शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होनार असून तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले तरच उद्या उद्योगपती या भागात गुंतवणूक करतील व तुमच्याकडे पवनचक्की, सौरउर्जेचे काही प्रकल्प येतील  या उद्योगपतींकडून खंडणी मागणाऱ्यांना आणि त्यांचा रस्ता अडवणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. तीन ते चारपेक्षा अधिकवेळा गुन्हेगारी कृत्यात आढळून आल्यास संबंधितांवर मकोका लावला जाईल, असा इशारा अजित पवार यांनी आज बीड मधे दिला.

    अजित पवार यांनी बीडच्या  पालकमंत्रीपदाची धुरा स्वीकारल्यानंतर गुरुवारी ते पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये आले आहेत. या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात रोखठोख भाषण करताना पक्षात आणि बीड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि चुकीची कृत्यं खपवून घेतली जाणार नाहीत, असा थेट इशारा दिला.

    तुम्ही निवडणुकीत किती पैसे खर्च करता मग आपल्या भागातील विकासकामांसाठी तशी भावना तुमच्या मनात का नाही? विकासकामे करताना आपल्या भागाबद्दल तुमच्या मनात आपलेपणा का नाही? आता सत्ता आल्यानंतर अनेक हौशे-गवशे येऊन मला भेटतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला हे लोक दुसऱ्याच पक्षात होते. मात्र, आता येऊन सांगत आहेत की, दादा मी तुमच्यासोबतच आहे. हे असं चालणार नाही. मी काही दिवस तुमचं वागणं-बोलणं बघेन. प्रत्येक ठिकाणी सरड्यासारखे रंग बदलणारी जमात असते, ती माझ्या पक्षातही आहे. हे लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. पण आता तसलं चालणार नाही, हे मी सांगतो. उद्या परत कोणी माझ्याकडे आलं, एवढ्यावेळेला पांघरुण घाला, असे म्हणतील. पण माझं पांघरुण फाटून गेलंय. एवढ्यावेळेस तुम्हाला पदरात घेऊन आता माझा पदरच उरलेला नाही. त्यामुळे सर्व नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना योग्यप्रकारे वागण्याच्या सूचना द्याव्यात. तुम्ही चांगलं वागलात तर मी तुमच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी करेन. पण चुकीचे वागणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यात विकासकामे करताना पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा केली जाईल. सगळ्यांनी स्वच्छ प्रतिमा ठेवा. लोकं बोलली पाहिजेत, हे लोक खरंच व्यवस्थित पद्धतीने काम करत आहेत. आपल्याला कोणाचा अवमान करायचा नाही. पण विकासकामे करताना फक्त पुढाऱ्यांना विचारुन होत नाही. जनतेशी आणि समाजाशी संबंध असणाऱ्या लोकांना विचारले पाहिजे, आपल्या भागातील साहित्यिक, विचारवंत आणि पत्रकारांचे म्हणणे लक्षात घेतले पाहिजे. मी काम करताना कोणताही भेदभाव करणार नाही. मात्र, इतरांनी तो केला तर मी खपवून घ्यायला साधूसंत नाही. तुम्ही दुटप्पी वागणार असाल तर मी काम करणार नाही. मी सरळमार्गी आहे, सगळ्यांना मदत करेन. आम्ही इकडे विटू-दांडू, गोट्या किंवा पतंग खेळायला आलेलो नाही, आम्ही इकडे काम करायला आलेलो आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!