तब्बल ४५ वर्षांच्या खंडानंतर राजकिशोर मोदी व त्यांच्या इयत्ता ८ वी मधील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न*
तब्बल ४५ वर्षांच्या खंडानंतर राजकिशोर मोदी व त्यांच्या इयत्ता ८ वी मधील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- तब्बल ४५ वर्षाच्या कालखंडानंतर अंबाजोगाई नगर परिषदेचे माजी अध्यक्ष राजकिशोर मोदी व त्यांच्या सोबत इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेले त्यांचे शालेय वर्गमित्र यांचा २६ जानेवारी रविवार प्रजासत्ताक दिनी ३० ते ३५ विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा मोदी लर्निंग सेंटरच्या फार्मसी महाविद्यालयात संपन्न झाला. ४५ वर्षानंतर देखील जमा झालेले अनेक वर्गमित्र एकमेकांना त्याच्या नावानिशी ओळखताना दिसून आले. सर्व प्रथम राजकिशोर मोदी यांनी उपस्थित सर्व वर्गमित्रांचे फेटा बांधून व श्री योगेश्वरी देवीची प्रतिमा देऊन सर्वांचे स्वागत केले.
तब्बल ४५ वर्षानंतर शाळेतील वर्गमित्रांचा स्नेह मिलन सोहळा घडून आला. वर्गमित्रांच्या या स्नेहमिलनात एकमेकांनी शाळेतील त्या सोनेरी दिवसांच्या विविध आठवणीना उजाळा दिला. त्या काळामध्ये कोण कशा खोड्या करायचा, कोण अभ्यासात हुशार होते तर कोण क्रीडा विभागात निपुन होते याबाबत सविस्तर अशी चर्चा घडली . त्यानंतर अतिशय आस्थेवाईकपणे त्याच्यात कौटुंबिक चर्चा झाली
इयत्ता ८ वि मधील ३० ते ३५ मित्र ४५ वर्षानंतर एकत्र जमले होते. जमा झालेल्या मित्रांमध्ये कोणी मुंबई, छत्रपती संभाजी नगर, पुणे,अकोला अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र आले होते. या भेटी दरम्यान सर्वांमध्ये हास्यकल्लोळ, कुमारवयातील गप्पा टप्पा चांगल्याच रंगल्या. या सर्व सवंगड्यांना ४५ वर्षानंतर भेटून सुद्धा आपण नुकतेच भेटल्याची भावना निर्माण झाल्याचे दिसून आले.जुन्या आठवणींना सर्वांनी उजाळा देत स्नेह भोजनांचा आनंद लुटला. अशा भेटी वारंवार व्हाव्यात असा संकल्प उपस्थित सर्व वर्गमित्रांनी एकमेकात ठरवला.
उपस्थित वर्गमित्रांमध्ये अच्युत हंगे, नरसिंग चिक्षे, पुरुषोतम भुतडा, ओमप्रकाश इंदाणी,हरीचंद्र बडेरा, ओमप्रकाश मुंदडा, संजय काटे ,मिलिंद बाभुळगांवकर, शिरीष खेडगीकर , नागेश नागापूरकर, सुनील राऊतमारे, प्रकाश सरवदे,सुनील पिंपळकर , अनीरुध्द जहागीरदार, नरेंद्र सोळंकी, मंगेश केतकर, राहुल दुधमाडे,गणेश सूर्यवंशी, बसलींग हारंगुळे,चंद्रकांत देशमुख रवी देशपांडे, सुनील जीरे,प्रमोद कदरे मोहन वैद्य, तहकिश कुलकर्णी, सुनील हाजारी,अजय हाजारी, सुरेश कुलकर्णी, शंकर हारेगांवकर, नरसिंग कदम, नंदकुमार बर्दापुरकर, मुकुंद देशपांडे, ज्ञानोबा मुंडे ,रमेश देशपांडे, अरुण डुबे, बाबासाहेब चव्हाण, अरुण कुलकर्णी, धनंजय गोरे , नितीन मार्कडे , सुनील गोस्वामी, अच्युत हंगे , अजय दिख्खत यांचा समावेश होता.
उपस्थित अनेक मित्रांनी आपली भूमिका मांडताना राजकिशोर मोदी यांचे कौतुक केले. अनेक मित्रांनी त्यांनी सामाजिक, राजकिय ,शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल अभिनंदन केले. त्यांनी अंबाजोगाई सारख्या छोट्या शहरात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण उपलब्ध करुन देऊन येथील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची दारे खुली करून दिल्याचे अभिमानाने सांगितले. मोदी लर्निंग सेंटर येथील सर्व संस्थां व शैक्षणिक संकुलास भेट देऊन सर्वांनी समाधान व्यक्त केले.
राजकिशोर मोदी यांनी देखील आपल्या वर्गमित्रांसोबत बोलताना सांगितले की आपण राजकिय तसेच सामाजिक जीवनात वावरताना कधीच कोणाचा जाणूनबुजून द्वेष किंवा हेवा केला नाही. नियमाच्या व कायद्याच्या चौकटीत राहूनच आपण अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले. सहकार क्षेत्रात पाऊल टाकताना केवळ दहा लाख रुपये घेऊन श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था उभा केली. ती आज ५२ कोटींची उलाढाल करत आहे. कालांतराने अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेची स्थापना केली . हळूहळू एका बॅंकेच्या महाराष्ट्रात २० शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देत आहे. बँकेने आज ५१५ कोटींचा टप्पा गाठला असून पन्नास हजाराच्या वर ग्राहक अंबाजोगाई पिपल्स बँकेची सेवा घेत आहेत. अंबाजोगाई शहरात पहिली सिबीएसई शाळेची स्थापना केली. त्याचबरोबर फार्मसी, डी एड बी एड , संगणक महाविद्यालय आदी शैक्षणिक संस्था अंबाजोगाई शहरात उभा केल्या असल्याचे राजकिशोर मोदी यांनी याप्रसंगी नमूद केले.
