एचआयव्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार, जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार
एचआयव्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार, जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार
बीड (प्रतिनिधी)
एचआयव्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यात घडला आसून ही अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप करत यांच्या विरोधात पीडित कुटुंबाने तक्रार दिली आहे.
पोटचा गोळा गेल्याचं दु:ख पचत नाही तोच गावाने वाळीत टाकल्यामुळे या कुटुंबाने हतबलता व्यक्त केली आहे. ‘मुलीचा एचआयव्हीमुळे मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे कुटुंबाची समाजात बदनामी झाली, तसंच गावातील लोकांनी आम्हाला वाळीत टाकलं. कुणीही भेटायला जवळ येत नाही. आमच्यासोबतचे व्यवहारही लोकांनी थांबवले आहेत’, अशी आपबिती पीडित कुटुंबाने सांगितली आहे. तसंच या आरोपांमुळे घरातल्या महिलेने दोन वेळा जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, असा दावाही कुटुंबाने केला आहे.
डॉक्टर-पोलिसाविरोधात तक्रार
याप्रकरणी कुटुंबाने डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात पीडित कुटुंबाने एक ऑडिओ क्लिपही दाखवली. ही ऑडिओ क्लिप पोलीस कर्मचाऱ्याची असल्याचं पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे. तुमच्या मुलीला एचआयव्ही होता, तिच्या अंत्यविधीला जवळ ज्या व्यक्ती होत्या, त्याची तपासणी करून घ्या, असं या ऑडिओ क्लिपमधली व्यक्ती म्हणत आहे. ही व्यक्ती पोलीस असल्याचा दावा कुटुंबाने केला आहे.
मुलीच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून पोलीस आणि डॉक्टरांनी अशी अफवा पसरवल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. ‘आमची मुलगी गेली, पण जवळचे लोकही भेटायला आले नाहीत. या अफवेमुळे कुणीही आमच्याजवळ येत नाही. आरोग्य विभागाने खोटा अहवाल दिला आहे, सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून हे झालं आहे, आम्हाला न्याय द्या.’, अशी मागणी कुटुंबाने केली आहे. या प्रकरणात पीडित कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे.
डॉक्टर-पोलिसांची सावध प्रतिक्रिया
पीडित कुटुंबाच्या आरोपावर बोलताना आष्टी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे प्रकरण पाहावं लागेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर पोलिसांना याबाबत विचारलं असता डॉक्टरांनी जे सांगितलं त्यासंदर्भात आमच्या कर्मचाऱ्यांनी समजवून सांगण्यासाठी हे सांगितलं, दुसरा कोणताही हेतू नव्हता, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.