सामाजिक सद्भावना आणि महाविद्यालयांतील लोकशाही या विषयावर ‘देशव्यापी विद्यार्थी अधिवेशन’
सामाजिक सद्भावना आणि महाविद्यालयांतील लोकशाही या विषयावर ‘देशव्यापी विद्यार्थी अधिवेशन’
आज मुंबई येथे संपन्न होणार ; बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग
बीड :- प्रतिनिधी
धर्मनिरपेक्षता,सामाजिक सौहार्द आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या तत्त्वांवर दृढ विश्वास ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील विविध शिक्षण संस्था व विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘स्टुडंट्स फॉर डेमोक्रसी’ हा फोरम बनवला आहे. याद्वारे आज १८ जानेवारी २०२५ रोजी नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे ‘एकता एक्सप्रेस@मुंबई’ हा उपक्रम आयोजित होत आहे.
यामधे देशात पसरवल्या जाणाऱ्या धार्मिक,जातीय द्वेषाविरुद्ध एकत्र येऊन धर्मनिरपेक्ष लोकशाही मूल्यांसाठी रॅली काढली जाणार आहे. यात विविध शिक्षणतज्ज्ञ, कलाकार, पत्रकार आणि विद्यार्थी सामील होणार आहेत.
सामाजिक एकोप्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी सुसंवाद आणि सहिष्णुता ही मूल्ये महत्त्वाची आहेत. असे असूनही, या मुल्यांसाठी आवाज उठवणाऱ्या व्यक्तींवर सरकारकडून क्रूर दडपशाही केली जात आहे, यामुळे एक प्रतिकूल वातावरण देशात निर्माण झाले आहे. परिणामी,आपल्या समाजात जातीय राजकारण आणि फुटीरतावादी घटकांचा प्रसार वाढला आहे. याला विरोध करण्यासाठी विविध क्षेत्रातील लोकांना एकत्र आणणारे एक व्यासपीठ आवश्यक आहे.
शिक्षण क्षेत्रामध्ये,युजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणावर परिणाम करणाऱ्या घटकांच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे पण वास्तविक, अनेक विद्यापीठांमध्ये कार्यरत विद्यार्थी संघटना नाहीत, निवडणुका होत नाहीत . शिक्षण हे केवळ एक बाजारू वस्तू बनले आहे.
विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीचे दमन करणाऱ्या अनेक त्रासदायक घटना अलीकडे घडत आहेत. हा एक ट्रेंड बनू पाहत आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन आम्ही आयोजित करत आहोत.
या अधिवेशनात ‘दर्जेदार शिक्षण आणि महाविद्यालयीन लोकशाहीची गरज’,
तसेच ‘सामाजिक सद्भावना आणि एकोपा वाढविण्यात कलाकारांची भूमिका’ या विषयांवर चर्चासत्र होणार आहे.
यावेळी सफदर हाश्मी मेमोरियल ट्रस्ट (सहमत) कडून कला प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय ‘एकता क्विझ’ ही प्रश्नमंजुषा स्पर्धा या अधिवेशनात होणार आहे.
तसेच लोक सांस्कृतिक मंच,मुंबई यांच्याकडून सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.
या विद्यार्थी अधिवेशनात
डॉ. भालचंद्र मुणगेकर (माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ आणि माजी राज्यसभा सदस्य),
किरण माने (अभिनेते),
प्रा. आर. रामकुमार (प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ),
संभाजी भगत( पुरोगामी कलाकार व शाहीर ),
आयशी घोष (जेएनयू विद्यार्थी संघाच्या माजी अध्यक्ष), डॉ. नितीश नारायणन (लेखक), दिप्सिता धर (कलाकार व विद्यार्थी नेत्या), सृजन भट्टाचार्य आणि उत्तम घोष (व्यंगचित्रकार) असे दिग्गज अभ्यासक,कलाकार,विद्यार्थी नेते सहभागी होऊन विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत.
अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आणि सर्व पुरोगामी व्यक्तींनी या अधिवेशनात सहभागी व्हावे,असे आवाहन आम्ही करत आहोत. या अधिवेशनात बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्याचा मोठ्या संख्येने सहभाग राहणार आहे.
आयोजन समितीच्या वतीने रोहिदास जाधव, सोमनाथ निर्मळ आणि रामदास प्रिनी शिवनंदन यांच्या द्वारा प्रसारीत
