संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात
बीड (प्रतिनिधी)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आसून सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी विष्णू चाटेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आल्यानंतर विष्णू चाटेची रवानगी लातूर कारागृहात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दोन कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात सुरुवातीला ताब्यात घेतल्यानंतर खुनाच्या गुन्ह्यात आणि नंतर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या विष्णू चाटेने सुरुवातीला केज कोर्टात बीड ऐवजी लातूर कारागृहात ठेवावे यासाठी अर्ज केला होता. सुरुवातीला हा अर्ज केज न्यायालयाने फेटाळला होता. मात्र, पुन्हा विष्णू चाटेच्या वकिलाने कोर्टाकडे विनंती केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ही मागणी कोर्टाने मान्य केली आहे. विष्णू चाटेला नक्की धोका कोणापासून आहे? हत्येतील सर्व आरोपींपासून विष्णू चाटेला वेगळं का ठेवण्यात येतंय? हा सवाल मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.
लातूरच्या कारागृहात रवानगी
सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, प्रतिक घुले, जयराम चाटे, महेश केदार या सहा जणांनी मिळून देशमुख यांची हत्या केली होती. विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत या 8 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आता या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटेला सुरक्षेच्या कारणास्तव लातूरच्या कारागृहात रवानगी केली आहे. संतोष देशमुख प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे याला देण्यात आलेली दोन दिवसांची कोठडी वाढवून 18 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या अपहरणावेळी विष्णू चाटेने 35 वेळा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांना कॉल करून 15 मिनिटात सोडतो असं सांगत 36 व्या कॉलला संतोष देशमुखांची डेडबॉडी पाठवली होती. त्यानंतर फोन बंद करून विष्णू चाटे फरार होता.विष्णू चाटे फरार असताना नाशिकमध्ये मोबाईल फेकून दिला असल्याची माहिती आहे, तो कोणत्या ठिकाणी फेकला हे आठवत नसल्याचे तो ‘सीआयडी’ला सांगत असल्याचे सांगण्यात आले होते. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात आतापर्यंत पाच मोबाईल जप्त केले होते.
फोनवरून सरकारी वकिलांना न्यायाधीशांनी केला सवाल
आत्तापर्यंत जप्त केलेले सर्व मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत. विष्णू चाटेच्या मोबाईल वरूनच खंडणीची धमकी देण्यात आली होती. हत्या प्रकरणात देखील विष्णू चाटेचा मोबाईल महत्त्वाचा आहे. याच मोबाईल संदर्भामध्ये काल केज जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद चालू असताना सरकारी वकिलांना न्यायाधीशांनी प्रश्न केले होते. जर 25 दिवसापासून हा आरोपी तुमच्या ताब्यात आहे, तर आणखी मोबाईल आढळून कसा आला नाही असा प्रश्न सरकारी वकीलांना विचारण्यात आला आहे.
