ताज्या घडामोडी

जरांगेंच्या शब्दाला मान धनंजय देशमुख टाकीवरुन उतरले अन् छातीला बिलगुन ढसढसा रडले

जरांगेंच्या शब्दाला मान धनंजय देशमुख टाकीवरुन उतरले अन् छातीला बिलगुन ढसढसा रडले

मी न्यायाची भीक मागतोय पण आमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला जातोय_ धनंजय देशमुख

केज (प्रतिनिधी)

   आवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाला दोन कोटी रुपयांची खंडणी मागीतल्या प्रकरणी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावावा तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही आरोपी करावे, या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी टाकीवर चढून सुरु केलेले आंदोलन तुर्तास मागे घेतले आसून माझ्या भावाला आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही. माझ्या चांगुलपणाचा फायदा कोण किती घ्यायला लागलं आहे, त्याबाबतचे स्पष्टीकरण मी देणार आहे. आम्ही चांगलं राहिल्याचा असा गैरफायदा घेतला जात असेल तर राहूनच काय उपयोग, असा उद्‌विग्न सवाल धनंजय देशमुख यांनी केला आहे.

    मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी वाल्मिक कराडवर खुनाचा आणि मोकाचा गुन्हा दाखल केला जात नाही. पोलिसांकडून तपासाची माहिती आम्हाला दिली जात नाही, याच्या निषेधार्थ संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले होते. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना पोलिसांवर आरोप केले. या वेळी ते म्हणाले, आमच्या संयमाचा गैरफायदा घेतला गेला आहे. मी भावाला न्याय मागतोय, न्यायाची भीक मागतोय. पण ठराविकच आरोपी घेतले जातात. कोणावर काय तुमचा संशय आहे का, अशी आमच्याकडे एकदाही विचारणा केली जात नाही. आमच्याकडे घटनाक्रमही विचारला जात नाही. न्याय मिळावा; म्हणून मोर्चात जातोय, मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो. या प्रकरणात आमचं काय म्हणणं आहे, तेही पोलिसांनी नोंदवून घेतलं पाहिजे.

ज्या दिवशी गाड्या सापडल्या. त्याच दिवशी एक चिठ्ठीही सापडली हेाती, त्यात चार लोकांची नावे होती. माझ्या भावाच्या गाडीमागे अजून एक गाडी होती. याबाबतची कुठलीही माहिती कोणाकडून दिली जात नाही. बीडच्या पोलिस अधिकाऱ्यांनी तपास लगेच सीआयडीकडे दिला. सीआयडीकडे दिलेला तपास योग्य आहे का, याबाबत आम्हाला का विचारलं नाही, असा सवालही धनंजय देशमुख यांनी केला.

धनंजय देशमुख म्हणाले, आतापर्यंतचा तपास असा असा आहे, तुम्हाला त्यात काय ॲडिशनल म्हणणे मांडायचं आहे का. याबाबतची काहीही माहिती पोलिस आमच्याकडून घेत नाहीत आणि त्यांच्याकडील तपास आम्हाला सांगत नाहीत. पोलिसांवर आम्ही कसा विश्वास ठेवायचा, अस सवाल धनंजय देशमुख यांनी केला.

 

धनंजय देशमुख यांचे आंदोलन तूर्तास मागे

  पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, अंबाजोगाईच्या अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके तसेच सहाय्यक पोलिस अधीक्षक कमलेश मिना आदी मस्साजोगला दाखल झाले. श्री. जरांगे व पोलिस अधिकारी धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधत आहेत.

  पवनक्की प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मागीतल्या प्रकरणी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडवर देखील मकोका लावावा आणि खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करावे, या मागणीसाठी धनंजय देशमुख यांनी पोलिसांना चकवा देत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केले होते मात्र आंदोल स्थळी आलेल्या मनोज जरांगे यांच्या विनंती ला मान देऊन तूर्तास धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!