*विद्यार्थ्यांनी असाध्य गोष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी- डॉ ज्ञानोबा दराडे*
*विद्यार्थ्यांनी असाध्य गोष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी- डॉ ज्ञानोबा दराडे*
*रौप्य महोत्सवी बाल झुंबड- २०२५ चा शानदार शुभारंभ*
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- कोणतीही गोष्ट साध्य किंवा असाध्य नसते. त्यामुळे कुठलीही असाध्य गोष्ट साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज असल्याचे मत स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र विभाग प्रमुख डॉ ज्ञानोबा दराडे यांनी व्यक्त केले. ते प्रियदर्शनी क्रीडा , सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने आयोजित बाल झुंबड- २०२५ च्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी बालझुंबड या उपक्रमाचे हे २५ वे म्हणजेच रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. प्रियदर्शनी क्रीडा मंडळाचे संस्थापक राजकिशोर मोदी यांच्या संकल्पनेतून अंबाजोगाई तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी बालझुंबड हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. कोव्हिडंचा काळ सोडला तर हा उपक्रम अखंडपणे चालू आहे. २०२५ च्या बालझुंबड उपक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ ज्ञानोबा दराडे , उद्घाटन दैनिक वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते, वसंतराव काळे विद्यालयाचे मुख्याध्यापक केदार सर, प्राचार्य रेंजू आरचंद्रन , प्राचार्य तरके सर, मुख्यध्यापक आनंद टाकळकर, आप्पा चव्हाण, विनायक मुंजे, विजय रापतवार, मुख्याध्यापिका श्रीमती अंजली जोशी तसेच परीक्षक म्हणून श्रीमती ज्ञानेश्वरी पवार, शीतल फुंदे, संभाजी गित्ते, कु ज्योती मुरकुटे, यांच्यासोबतच इक्बाल विद्यालयाचे अब्दुल मुजाहेद व पुसरेकर सर हे उपस्थित होते.
यावर्षीच्या बालझुंबड उपक्रमाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सुरुवात सावित्रीबाई फुले व साने गुरुजींच्या प्रतिमांचे पूजन करून तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक महाविद्यालयाचे प्राचार्य विनायक मुंजे यांनी केले.बाल झुंबड हे अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शाळा व शाळेतील विद्यार्थ्यांचे एकत्रित स्नेह संमेलन असल्याचे मुंजे यांनी सांगितले. मागील चोवीस वर्षापूर्वी प्रियदर्शनी क्रीडा मंडळाचे संस्थापक राजकिशोर मोदी, सांस्कृतिक विभाग प्रमुख दिनकर जोशी यांनी बाल झुंबड हा उपक्रम सुरू केला आणि त्या उपक्रमाचे आज रौप्यमहोत्सवी वर्ष असून या उपक्रमाची परंपरा मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत राजकिशोर मोदी हे पुढे चालवीत आहेत. या उपक्रमात दरवर्षी नाविन्यपूर्ण स्पर्धा आणण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात येत असल्याचे प्राचार्य विनायक मुंजे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. याप्रसंगी वसंतराव काळे विद्यालयाचे प्राचार्य केदार सरांनी बालझुंबड या उपक्रमाला आपल्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे स्वा रा ती चे नेत्र विभाग प्रमुख डॉ ज्ञानोबा दराडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेय विद्यार्थी व वातावरण पाहून आपणास शालेय जीवन आठवल्याचे डॉ दराडे यांनी नमूद केले. बाल – झुंबड उपक्रमातील विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असून याचा लाभ घेण्याचे अवाहन देखील डॉ.दराडे यांनी केले आहे. राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कोवळ्या रोपट्याला आकार देण्याचे काम बाल झुंबड हा उपक्रम करत असून या उपक्रमाचे अभिनंदन करत डॉ दराडे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आवाहन डॉ दराडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. यासाठी त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या ओव्याच्या आधार घेतला. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आपले ध्येय निर्धारित करून ते गाठण्यासाठी आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे असाही मौलिक सल्ला डॉ ज्ञानोबा दराडे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
बालझुंबड २०२५ च्या उद्घाटन समारंभाचा अध्यक्षीय समारोप दैनिक वार्ताचे संपादक परमेश्वर गित्ते यांनी केला. सर्वप्रथम त्यांनी बालझुंबड या उपक्रमाला २५ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल प्रियदर्शनी क्रीडा मंडळाचे संस्थापक राजकिशोर मोदी, दिनकर जोशी, संकेत मोदी व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. या उपक्रमात सहभागी झाल्यानंतर विद्यार्थी ताजेतवाने झाल्याचा अनुभव करतात यावरून बाल झुंबड हा उपक्रम हा विद्याथ्यांची एक सांस्कृतिक चळवळ झाल्याचे परमेश्वर गित्ते यांनी स्पष्ट केले. या उपक्रमातुन आतापर्यंत अनेक विद्यार्थी मोठ्या उच्च पदापर्यंत पोचले असून ,अनेकजण उत्कृष्ट खेळाडू त्याचबरोबर विविध क्षेत्रात आपले नाव झळकावत असल्याचे देखील गित्ते यांनी अभिमानाने सांगितले. यातून राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाई शहरात शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्र रुजवण्यासाठी चे व्रत लिलया पेलले असल्याचे सांगत बालझुंबड हा उपक्रम यापुढेही असाच अखंडितपणे सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त करत या उपक्रमाच्या संपूर्ण टीम चे अभिनंदन केले आहे.आजच्या या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्र संचलन बाल झुंबडचे समन्वयक राजेश कांबळे तर उपस्थित सर्वांचे आभार प्रा आनंद कांबळे यांनी व्यक्त केले. आजच्या पीपीटी स्पर्धेत जवळपास ८० शालेय टीमच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवला. याप्रसंगी विविध शाळेतील अनेक विद्यार्थी व त्यांचे शिक्षक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
