खंडणी मागण्यांसाठी आलेल्या वॉचमनला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी सुदर्शन घुलेसह चौघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल*
खंडणी मागण्यांसाठी आलेल्या वॉचमनला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी सुदर्शन घुलेसह चौघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
केज – मस्साजोग (ता. केज) येथील पवनचक्कीच्या प्रकल्प कार्यालयात खंडणी मागणीसाठी आलेल्या चौघांनी वॉचमनला जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी सुदर्शन घुलेसह चौघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवादा एनर्जी कंपनीच्या मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्प कार्यालयात ६ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास खंडणीची मागणी करण्यासाठी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे व अन्य एक जण आले. त्यांना गेटवर वॉचमन अशोक सोनवणे (रा. मस्साजोग) यांनी अडविले. त्यांना या चौघांनी जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर कंपनीचे शिवाजी थोपटे यांना ही मारहाण केली. ही माहिती समजताच सरपंच संतोष देशमुख हे कार्यालयात गेले, त्यांनी गावातील कर्मचाऱ्यांची बाजू घेत आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले होते. यावेळी तक्रार देण्यास गेलेले वॉचमन अशोक सोनवणे यांची अॅट्रॉसिटीची फिर्याद घेतली नव्हती. तर शिवाजी थोपटे यांच्या तक्रारीवरून गन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणात जामीन होताच राग मनात धरून सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर अपहरण करीत त्यांची क्रूरतेने हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या घटनेनंतर १२ डिसेंबर रोजी अशोक सोनवणे यांची फिर्याद घेण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरून सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे व अन्य एक जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे तपास करीत आहेत.
