मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अज्ञात इसमानी अपहरण करून केला खून, केज तालुक्यात खळबळ
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अज्ञात इसमानी अपहरण करून केला खून केज तालुक्यात खळबळ

ग्रामस्थांचा केज पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या, काही तासांनी मृतदेह सापडल्याचे वृत्त
केज:-(प्रतिनिधी)
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बीड रोडवरील डोंनगाव फाट्या पासून अज्ञात इसमानी अपहरण करून खून केल्याचे उघड झाले असून केज तालुक्यात खळबळ उडाली आहे. मस्साजोग येथील ग्रामस्थांनी केज पोलीस स्टेशन मध्ये एकच गर्दी करून ठिय्या मांडला आहे.
या विषयी प्राप्त माहिती अशी की, केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष पंडितराव देशमुख व त्यांचे सहकारी शिवराज लिंबराज देशमुख हे आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आपल्या चार चाकी मधून केज हुन मस्साजोग कडे जात असताना टोलनाक्या नजीक असलेल्या डोंनगाव फाट्या नजीक यांचा पाठलाग करणाऱ्या 3 वाहनांनी संतोष देशमुख यांच्या गाडीला आडवी गाडी लावली, लागलीच मागून एक काळी स्कारपीओ त्या ठिकाणी आली, आतील आरोपीने संतोष ची गाडी चालवणाऱ्या लिंबराज देशमुख यांच्या जवळचा काच फोडला आणि दुसऱ्या बाजूने संतोषचा जबरदस्तीने दरवाजा उघडून त्याला खेचले आणि स्कारपीओ मध्ये कोंबून ही सुसाट वेगाने केजच्या दिशेने रवाना झाली.
दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच मस्साजोग येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने केज पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले असून त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये एकच गर्दी करून ठिय्या मांडला आहे. दरम्यान संतोष देशमुख यांच्या शोधा साठी पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन व पो उ नी शिंदे यांच्या अधिपत्या खाली 2 पोलीस पथके रवाना झाली होती मात्र त्यांचा मृतदेह मिळाल्याचे वृत्त आहे.
प्राप्त माहिती नुसार 2 दिवसा पूर्वी मस्साजोग येथील ग्रामस्थांचे इतर गावातील युवका सोबत तुफान भांडण झाली होती त्याचा या प्रकाराशी काही संबंध आहे का याचा शोध ही पोलीस घेत आहेत.
