११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाची तयारी पुर्ण उद्घाटन; दोन कवी संमेलन; दोन परिसंवाद; कथाकथन आणि समारोप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन
११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाची तयारी पुर्ण
उद्घाटन; दोन कवी संमेलन; दोन परिसंवाद; कथाकथन आणि समारोप
अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन
स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांची माहिती
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
मराठवाडा साहित्य परिषद शाखा अंबाजोगाईच्या वतीने १४ व १५ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाची संपुर्ण तयारी झाली असून त्याची कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यात आली असल्याची माहिती स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी पत्रकार संवाद बैठकीत दिली.
११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या संमेलनाची संपुर्ण माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार संवाद बैठकीत बोलताना स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी पुढे सांगितले की, मसाप शाखा अंबाजोगाईच्या वतीने १९९८ अंबाजोगाई साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. यावर्षी १४ व १५ डिसेंबर रोजी होणारे हे साहित्य संमेलन एक दशक पुर्तीनंतर होणारे पहिले संमेलन आहे. त्यामुळे हे संमेलन मागील १० संमेलना पेक्षा अधिक व्यापक आणि नाविण्यपूर्ण उपक्रमांचा सहभाग करुन ते यशस्वी करण्यासाठी मी आणि संयुक्त स्वागत समितीचे सदस्य मागील काही महिन्यांपासून प्रयत्न करीत आहोत.
या संमेलनाची सुरुवात आपण ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणारी जागर दिंडी काढुन करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये आणि एकुण समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकांप्रति सन्मान आणि आदरभाव वाढावा ही या मागची मुळ संकल्पना आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही जगरदिंडी दुपारी ३:०० वाजता निघेल. या दिंडीत शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणारे फलक हातात घेवून घोषणा देत संमेलन स्थळी येतील. याठिकाणी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची हे विद्यार्थी गुलाबपुष्प देवून सत्कार करतील व त्यांना सभागृहात नेवून स्थानापन्न करतील.
या जागर दिंडीचे उद्घाटन मागील संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य बी. आय. खडकभावी हे करतील. संयुक्त स्वागत समितीचे सर्व पदाधिकारी, शिक्षक मैत्री प्रतिष्ठान चे सदस्य, वाद्यवृंद पथक व विद्यार्थी मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी होतील. या उपक्रमाचे संयोजक म्हणून सुनील व्यवहारे, कैलास चोले, नामदेव मुंडे, विजय रापतवार, विष्णू सरवदे, ऍड. आनंद जगतकर, लक्ष्मण गोरे हे असणार आहेत.
सायंकाळी चार वाजता या दोन दिवसीय अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे उद्घाटन संमेलन अध्यक्ष तथा महाराष्ट्रातील प्रतिथयश लेखक
बालाजी सुतार, प्रमुख अतिथी औरंगाबाद येथील शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा सामाजिक आणि साहित्य चळवळीचे भाष्यकार डॉ. शिरीष खेडगीकर, स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार, मसाप अध्यक्ष दगडू लोमटे व संयुक्त स्वागत समितीचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत होईल.
▪️ पुरस्कार वितरण
साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मसापच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यामध्ये प्रख्यात कवी रचना यांना डॉ. शैला लोहिया लेखिका पुरस्कार, कथा लेखक उमेश मोहीते यांना मंदाताई देशमुख कथा लेखन पुरस्कार आणि अलीम अजित यांना प्राचार्य संतोष मुळावकर शिक्षक लेखन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. स्मृती चिन्ह, रोख रक्कम आणि शाल व श्रीफळ असे या सन्मानाचे स्वरुप आहे.
▪️ पुस्तक प्रकाशन
या कार्यक्रमात शहर व परिसरातील ज्या साहित्यिकांना आपल्या नवीन पुस्तकांचे प्रकाशन करावयाचे असेल अशा लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष व व्यासपीठावरील इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हे प्रकाशन करता येईल.
या उद्घाटनीय कार्यक्रमानंतर रात्री व दुसरे दिवशी विविध उपक्रमांची रेलचेल राहणार आहे.
▪️ दोन स्वतंत्र कवी संमेलनाचे
आयोजन
अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या उद्घाटनीय सत्रानंतर लगेचच निमंत्रित कवींचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या निमंत्रितांच्या कवी संमेलनानंतर खुले कवी संमेलन होणार आहे.
निमंत्रितांचे कवी संमेलन हे सायंकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत होणार आहे. या निमंत्रितांच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी आणि सुप्रसिद्ध गझलकार प्रा. मुकुंद राजपंखे हे असणार असून या संमेलनाच्या संयोजकाची जबाबदारी हे अश्रब पठाण यांच्या वर आहे. या निमंत्रितांच्या कवी संमेलनामध्ये रचना, निशा चौसाळकर, राजेश रेवले, विद्याधर पांडे, वंदना कोपले, पवन खरात, संध्या सोळुंके, संजय खाडप, तिलोत्तमा पतकराव, रमेश मोटे, गोविंद हाके, भगवान शिंदे, प्राचार्य अखिला गौस, सतीष घाडगे, जयश्री मुंडे, प्रा. विष्णू कावळे, प्रा. सारिका गुंडरे, अंतर हुसेन, बलराज संघई, पुष्पा बगाडे, इंदुताई पल्लेवार, कृष्णा भोकरे, शिलादेवी गायकवाड, प्रा. अर्चना कुलकर्णी यांचा सहभाग असणार आहे.
निमंत्रितांच्या कवी संमेलनानंतर लगेचच खुल्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ ते १० या कालावधीत हे खुले कवी संमेलन होईल. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री वंदना कोपले या असणार असून या कवी संमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी सुजाता भोजने आणि महंमद खाजा यांच्या वर राहणार आहे. या निमंत्रितांच्या कवी संमेलनातील सहभागी कवींची यादी किमान ५० कवींच्या पुढे असेल असे दिसते.
▪️ नव्या शैक्षणिक धोरणात भाषा
शिक्षण विषयावर परिसंवाद
साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी “नव्या शैक्षणिक धोरणात भाषा शिक्षण” या विषयावरील परिसंवाद १५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ -हदयरोग तज्ञ व एक जागरुक पालक व भाषा विषयाचे अभ्यासक डॉ. सिध्देश्वर बिराजदार हे राहणार असून या परीसंवादाचे सुत्रसंचलन व संयोजना ची जबाबदारी डॉ. शशिकांत पुरी यांचेवर आहे. या परीसंवादात इंग्रजी विषयाचे अभ्यासक श्रीधर नागरगोजे, मराठी विषयाचे अभ्यासक राम शेळके आणि उर्दू विषयाचे अभ्यासक सय्यदा सालेहा जबीं या आपले नव्या शैक्षणिक धोरणात भाषा शिक्षण या विषयावर स्वतंत्र भाष्य करतील.
▪️ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या
साहित्यावर परीसंवाद
साहित्य संमेलनाच्या दुसरे दिवशी अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या प्रथेप्रमाणे संमेलनाचे अध्यक्ष यांच्या साहित्यावरील परी संवादाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बालाजी सुतार यांच्या साहित्यावरील परिसंवाद १५ डिसेंबर रोजी दुपारी १ ते ३ या कालावधीत होणार आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार लेखक व विचारवंत अमर हबीब हे राहणार आहेत. तर या परिसंवादाचे संयोजन व सुत्रसंचालन प्रा. रमेश सोनवळकर हे करणार आहेत.
या परिसंवादात बालाजी सुतार यांनी लिहिलेल्या नाटकांवर अमृत महाजन, कथा या साहित्य प्रकारावर प्रा. शैला बरुरे, कवीता या साहित्य प्रकारावर अमर हबीब तर इतर साहित्य (संकीर्ण) या विषयावर पत्रकार श्रीकिशन काळे हे आपले भाष्य करणार आहेत. या परिसंवादाचा समारोप अमर हबीब हे करतील.
११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बालाजी सुतार हे महाराष्ट्रातील एक प्रगल्भ साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहिलेल्या साहित्यावर नाटकं, चित्रपट आणि लघुपट निघत आहेत. एक दर्जेदार आणि सकस साहित्यिक म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या साहित्यावरील हा परिसंवाद संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
▪️कथा कथन
या संमेलनात या वर्षीपासून कथा कथनाचा कार्यक्रम वाढवण्यात आला आहे. १५ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे स्वरुप वेगळे राहणार आहे. योगेश्वरी नुतन विद्यालयातील ऋतुराज केंद् आणि वेणुताई चव्हाण कन्या विद्यालयातील गौरी रमेश कांबळे हे दोन विद्यार्थी आपल्या कथा सांगितल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका मंगला भुसा या राहणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संयोजक प्रा. पंडीत कराड हे असतील. शालेय विद्यार्थ्यांमध्ये कथा लेखनाची व वक्तृत्व कला विकसित व्हावी म्हणून अशा पध्दतीचा वेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे.
▪️समारोप:
या दोन दिवसीय अंबाजोगाई साहित्य संमेलनाचा समारोपीय कार्यक्रम १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संमेलन अध्यक्ष बालाजी सुतार हे असणार आहेत. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय किर्तीचे प्रख्यात दंत चिकित्सक डॉ. आदित्य पतकराव,
स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार, मसाप अध्यक्ष दगडू लोमटे यांच्यासह संयुक्त स्वागत समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहतील. या कार्यक्रमात अमर हबीब हे पुढील संकल्प जाहीर करणार आहेत.
▪️ विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण
या समारोपीय कार्यक्रमात ११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांचा, स्पर्धा संयोजकांचा आणि संमेलनाच्या यशस्वीतेसाठी गेली अनेक महीन्यापासून सतत कार्यरत असलेल्या संमेलन सजवणा-या हातांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
या समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिलोत्तमा पतकराव व प्रा. डॉ. सागर कुलकर्णी हे करणार आहेत तर संयोजक अनिकेत डिघोळकर आणि शरद लंगे हे असणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांस शहर व परिसरातील साहित्य व रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार, सचीव प्रा. पंडीत कराड, उपाध्यक्ष सुभाष बाहेती, वंदना तेलंग-कोपले, मसाप चे अध्यक्ष दगडू लोमटे, सचीव गोरख शेंद्रे, उपाध्यक्ष डॉ. राहुल धाकडे व ११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या संयुक्त समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.
