तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी पोखरी येथील तिघांवर गुन्हा दाखल
तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी पोखरी येथील तिघांवर गुन्हा दाखल
अंबाजोगाई – जुन्या वादावर बोलून समझोता करण्यासाठी गेलेल्या तरुणावर तिघा भावांनी तलवार, लाठ्या-काठ्यांनी प्राणघातक हल्ला चढविला. याप्रकरणी तिघांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
विनोद वसंत ढवारे (वय ३०, रा. पोखरी, ता. अंबाजोगाई) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. विनोदच्या फिर्यादीनुसार त्याच्या गावातील सुरज संतोष वाघमारे याने विनोदचे भाऊ महादेव, शंभू आणि आकाश यांच्या विरोधात अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली होती. सदर वाद चर्चेतून सामोपचाराने मिटविण्यासाठी विनोद, विलास कुराडे, विनोद बलवंत आणि भाऊ आकाश हे बुधवारी (दि.०४) रात्री ८ वाजता सुरज वाघमारे याच्या घराकडे गेले. त्या ठिकाणी वाद मिटविण्याबाबत चर्चा सुरु असताना सुरज घरात गेला आणि लोखंडी तलवार आणून त्याने विनोदवर वार केला. तर त्याचे भाऊ संतोष आणि शिवम यांनी विनोदला लाकडी दांड्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी विनोद सोबत आलेल्या ग्रामस्थांनी त्याला हल्लेखोरांच्या तावडीतून वाचविले आणि उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल केले. सदर फिर्यादीवरून सुरज संतोष वाघमारे, मनोज संतोष वाघमारे आणि शिवम संतोष वाघमारे या तिघांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल होताच सुरज वाघमारे यास पोलिसांनी अटक केली असून उर्वरित दोघे फरार आहेत. पुढील तपास एपीआय रंगनाथ जगताप करत आहेत.
