निसटत्या पराभवाचा दिलदारपणे स्वीकार करून पृथ्वीराज साठे यांनी मतदारसंघात सुरू केला आभार दौरा
निसटत्या पराभवाचा दिलदारपणे स्वीकार करून पृथ्वीराज साठे यांनी मतदारसंघात सुरू केला आभार दौरा
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्यात नुकत्याच विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका संपन्न झाल्या. निवडणुकीसाठी उभे असलेल्या काही उमेदवारांना जय ते काहींना पराजय स्वीकारावा लागला. विधानसभेच्या निकालानंतर शरदचंद्र पवार यांनी सर्व पराभूत उमेदवारांची बैठक बोलावून त्यांना पराभवाने खचुन न जाता पुन्हा जोमाने जनतेत मिसळून त्यांची कामे करण्यासाठी प्रेरित केले. शरद पवारांचा या वयातील देखील उत्साह व ऊर्जा पाहून बैठकीत उपस्थित सर्व उमेदवारांना नवीन स्फूर्ती मिळाल्याचे जाणवले.
झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान केज विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा केवळ २६०० मतांनी निसटता पराभव झाला. मात्र झालेल्या पराभवाने खचून न जाता त्यांनी त्या पराभवाचा मोठया दिलदार पणे स्वीकार करून मतदारसंघातील अवघ्या १,१४,३९४( एक लाख चौदा हजार तीनशे चौर्यांनऊ ) मतदारांनी मतदानरुपी दिलेल्या आशीर्वादाबद्दल त्या सर्व मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी पृथ्वीराज साठे यांनी संपूर्ण मतदारसंघात गुरुवार दि २८ पासून मतदारांसाठी आभार दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यात जागोजागी मतदार बंधू भगिनी या अत्यंत भावूक होऊन पृथ्वीराज साठे यांचे स्वागत करत करून त्यांनी दाखवलेल्या दिलदार पणाचे कौतुक देखील करताना दिसून येत आहेत.
केज विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवण्यासाठी उभे होते. मतदानावेळी उमेदवारी जाहीर होण्यासाठी झालेल्या विलंबामुळे प्रचारासाठी अत्यंत कमी कालावधी मिळाला होता. मात्र अशाही परिस्थितीत त्यांनी रात्रीचा दिवस करून संपूर्ण मतदार संघ पिंजून काढत प्रत्येक मतदारपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला व त्यात ते यशस्वी देखील झाले होते. त्याचेच फलित म्हणून पृथ्वीराज साठे यांना केज मतदार संघातुन १,१४,३९४ मतदान मिळाले आहे. मतदान दिलेल्या सर्व मतदारांचे आभार व्यक्त करणे हे आपले कर्तव्य असल्याच्या भावनेने पृथ्वीराज साठे यांनी दि २८ गुरुवार पासून मतदारांचा आभार दौरा सुरू केला आहे.
आजपर्यंत पृथ्वीराज साठे यांनी आभार दौऱ्यादरम्यान मतदार संघातील, आनंदवाडी, मांडवखेल,कळसंबर,भंडारवाडी,कारेगव्हाण,वडगाव कळसंबर, सोनपेठ,जैताळवाडी,येळंबघाट,खर्डेवाडी,धावाज्याचीवाडी, पांढऱ्याचीवाडी,बाळापूर,अंबिल वडगाव, सात्रा पोतरा,मुर्षदपूर, सावरगाव, अंधापुरी, नेकनूर, श्री क्षेत्र चाकरवाडी टाकळी, कोरेगाव, शिरपूर,जाधवजवळा,
कदमवाडी,डोणगाव,मस्साजोग,आरणगाव,काळेगाव,पिंप्री,कापरेवाडी,केवडगाव,बोरगाव,भोपळा,वरपगाव,चिंचोली, सारूकवाडी, डोका, सातेफळ, हदगाव, मांगवडगाव, लाखा, आणि साळेगाव गावात प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील गावकऱ्यांचे व मतदारांचे आभार व्यक्त केले.
या भेटीदरम्यान पृथ्वीराज साठे यांच्या निसटत्या पराभवामुळे मतदार बंधू भगिनींच्या डोळ्यात अश्रू दाटून आल्याचे अनुभवताच साठे देखील अनेक वेळा गहिवरून येत होते. मात्र उलटपक्षी साठेच मतदारांना खचून जाऊ नका यापुढेही मी सदैव आपल्या सुखदुःखाचा साक्षीदार होणार असल्याचे सांगत आपण यापुढेही एकदिलाने काम करण्याचे आवाहन करत होते. महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना केज मतदार संघातून मतदारांसह खासदार बजरंग सोनवणे, राजकिशोर मोदी,डॉ नरेंद्र काळे, हारून इनामदार, श्रीमती सीताताई बनसोड, सुरेशतात्या पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची मोलाची साथ मिळाली.
