न्यू व्हिजन पब्लिक स्कूल मध्ये बाराव्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
न्यू व्हिजन पब्लिक स्कूल मध्ये बाराव्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू व्हिजन पब्लिक स्कूल मध्ये आज बाराव्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन खेळाडू तसेच क्रीडा शिक्षक पीराजी कुसळे यांच्या हस्ते करण्यात आले. बाराव्या क्रीडा स्पर्धेची सुरुवात अंबानगरीचे ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरापासून क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आली. या क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन प्रा डी एच थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी, धनराज सोळंकी, प्रा सविता बनाळे, डॉ अर्चना थोरात यांची देखील उपस्थिती होती. प्रज्वलित करण्यात आलेली ज्योत शाळेच्या विद्यार्थ्यांकडून मोदी लर्निंग सेंटर पर्यंत नेण्यात आली. आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य रेंजो रामचंद्रन यांनी मुलांमध्ये खिलाडू वृत्ती बनली जावी यासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत भैया मोदी यांचे सर्वतोपरी सहकार्य असते , म्हणूनच आज पर्यंत आर्यन जिरे (कुराश ) कल्पेश जाधव ( फिन्सिंग ) ओम बडे ( फिन्सिंग ) हर्शवर्धन जगताप ( शूटींग ) प्रिया कांदे (फिन्सिंग स्टेट ) सर्व नॅशनल साठी पात्र झाले असल्याचे सांगितले .
शालेय क्रीडांगणावर या स्पर्धांचे उद्घाटन खेळाडू तथा क्रीडा शिक्षक पीराजी कुसळे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावरून बोलताना कुसळे यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे क्रीडा विषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की कोणत्याही स्पर्धकांकडून खिलाडू वृत्तीने कुठलाही खेळ खेळला जावा. खेळाकडे खेळ म्हणून पाहिले तर त्यातून आपनामध्ये खिलाडूवृत्ती ,शिस्त लागण्यात मदत होते. स्पर्धा म्हटले की कुणीतरी आपलाच एक सहकारी जिंकणार असतो. म्हणून हार जित याकडे दुर्लक्ष करून पुन्हा नव्या जोमाने त्या त्या खेळास सुरुवात करण्याचे आवाहन कुसळे यांनी केले. डॉ.डी.एच. थोरात यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळामधून विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास होतो व मुलांमध्ये योग्य निर्णय क्षमता विकसित होते . त्यासाठी मुलांनी खिलाडू वृत्तीने खेळ खेळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
शालेय क्रीडा विद्यार्थी प्रतिनिधी दीपल फड हीने विद्यार्थांना क्रीडा शपथ दिली. याप्रसंगी सर्व क्रीडा स्पर्धकांना संस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी, कार्यकारी संचालक संकेत भैया मोदी , संचालक प्रा डॉ. बी.आय. खडकभावी , मार्गदर्शक प्रा. वसंत चव्हाण, प्रा.सुरेश बिराजदार यांनी शुभेच्छा दिल्या .
