यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा शानदार समारोप यशवंतराव चव्हाण यांनी सर्वच क्षेत्रात केलेले काम आज ही दिशादर्शक- कुलपती डॉ . पी. डी. पाटील यांचे मत
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा
शानदार समारोप
यशवंतराव चव्हाण यांनी सर्वच क्षेत्रात केलेले काम आज ही दिशादर्शक- कुलपती डॉ . पी. डी. पाटील यांचे मत
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
यशवंतराव चव्हाण यांनी सामाजिक, राजकीय, साहित्य, औद्योगिक, सांस्कृतिक आणि इतर सर्वच क्षेत्रात केलेले काम आज दिशादर्शक आहे असे मत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केले.
येथील वेणुताई चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या समारोपीय भाषणात डॉ. पी. डी. पाटील बोलत होते. यावेळी पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन इटकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई चे दत्ता बाळ सराफ हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर मान्यवर अतिथींसोबत मा. विजय अण्णा बोराडे (कृषी), या. बाबा भांड (साहीत्य), पद्मश्री पं. सतीष व्यास (संगीत) आणि देविदास सौदागर (युवा गौरव) हे चार पुरस्कार मुर्ती यांच्या सह यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचीव दगडू लोमटे हे उपस्थित होते.
आपल्या विस्तारीत भाषणात पुढे बोलतांना डॉ. पी. डी. पाटील पुढे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांचे निधन १९८४ साली झाले आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा हा कार्यक्रम १९८५ साली भगवानराव लोमटे यांनी हा समारोह सुरु केला. गेली ४० वर्षे हा समारोह आज ही अव्याहतपणे सुरु आहे यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
यशवंतराव चव्हाण यांचे कार्य सर्व क्षेत्रात होते. राज्यातील सामाजिक, राजकीय, साहित्य, कृषी, सांस्कृतिक, औद्योगिक किंवा इतर असे एक ही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण यांचे कार्य केले नाही. यशवंतराव चव्हाण यांनी केलेले हे कार्य आज ही दिशादर्शक ठरणारे काम आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जपण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहता आले हे माझं भाग्य आहे असे त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणात त्यांनी पुरस्कार प्राप्त विजय अण्णा बोराडे, बाबा भांड, पं. सतीष व्यास आणि देविदास सौदागर यांचे कार्य आता मराठवाड्यापुरतेच मर्यादित राहिले नाही तर ते आता महाराष्ट्रालाही दिशादर्शक ठरणार आहे असे त्यांनी सांगितले.
*देविदास सौदागर यास ५
लाखांची भेट*
*या कार्यक्रमात युवा साहित्यिक म्हणून ज्यांचा गौरव करण्यात आला त्या देविदास सौदागर यांनी उच्च शिक्षण घेऊन ही ते आपल्या कुटुंबियांच्या उपजिवेकेसाठी शिलाई मशीन वर कपडे शिवण्याचे काम करीत आहेत. त्यांना या परस्थितीतुन बाहेर येण्यासाठी व त्यांची साहित्य सेवा विकसीत करण्यासाठी ५ लाख रुपये भेट देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.*
अंबाजोगाई शहरात गेल्या ३९ वर्षापासून यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जपण्यासाठी, त्यांच्या विचारांची जपवणुक या तीन दिवसीय स्मृती समारोहाची सुरु करण्याचे काम ही एक चळवळ आसून या कामाचे कौतुक डॉ. पी. डी. पाटील करुन स्मृती समितीला शुभेच्छा देवून संयोजकांचे कौतुक केले.
या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई चे दत्ता बाळ सराफ यांनी आपल्या भाषणात
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तीन दिवसीय समारोह साजरा करणारा हा एकमेव कार्यक्रम आहे, त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करणारे दगडू लोमटे व त्यांच्या सर्व सहका-यांचे मनापासून कौतुक करावे तेवढे कमी आहे. खरं तर यशवंतराव चव्हाण यांनी स्वतः एकही संस्था उभी केली नाही मात्र त्यांच्या नावाने अनेक संस्था उभी करणारी हजारो माणसं त्यांनी उभी केली.
पं जवाहरलाल नेहरु यांच्या सारखा देशाला पहिला पंतप्रधान आणि यशवंतराव चव्हाण यांच्या सारखा पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणे यांच्या सारखी भाग्याची गोष्ट नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जागृत करण्यासाठी गेली ४० वर्ष सुरू असलेल्या हा समारोह असाच अविरत सुरू रहावा अशा शुभेच्छा दत्ता बाळ सराफ यांनी दिल्या.
पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक सामाजिक कार्यकर्ते सचिन इटकर यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की, एखाद्या महापुरुषांच्या स्मृती जपण्याची परंपरा असलेल्या असे कार्यक्रम फार कमी आहेत. माझे शिक्षण कराड येथे यशवंतराव चव्हाण यांनी सुरु केलेल्या औषधशास्त्र महाविद्यालयात झाले. त्यामुळे यशवंतराव चव्हाण, वेणुताई चव्हाण यांच्या कार्य समाजातून घेतले आणि चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची माहिती देण्यासाठी अमेरिकेमध्ये ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची सहा भाषणं आयोजित करण्याची संधी मला मिळाली. याचा मला खुप आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा खरा वारसा चालवण्याचे काम मराठवाड्याने केला असल्याचे त्यांनी सांगून यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जपणा-या या महाराष्ट्रातील एकमेव कार्यक्रमाच्या आयोजना बद्दल संयोजकांना धन्यवाद दिले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रस्ताविक यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे सचीव दगडू लोमटे यांनी केले. आपल्या प्रास्ताविक त्यांनी या समारोहाची सुरवात ३९ वर्षापुर्वी या समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व.श्री. भगवानरावजी लोमटे उर्फ बापू, भगवानराव शिंदे व त्यांच्या सहका-यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार तथा पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरराव चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी केली. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या निर्मिती साठी यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असणाऱ्या साहित्य, कला-संगीत, कृषी आणि युवा शक्ती यांची सांगड घालत यासर्व बाबींची माहिती या तीन दिवसीय यशवंराव चव्हाण स्मृती समारोहात दिली. यापुर्वी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास महाराष्ट्रातील अनेक मान्यवर विचारवंतांनी आपली हजरी लावली असून या वर्षीच्या समारोहाच्या उद्घाटन कार्यक्रमास गांधीवादी विचारवंत तुषार गांधी आणि सिनेअभिनेते किरण माने यांनी उपस्थिती लावली तसेच कवी संमेलन, बाल आनंद मेळावा, सुफी व गजल गायन मैफील, शेतकरी परीषद या सर्व कार्यक्रमास तसेच या समारोपीय कार्यक्रमास डॉ. पी. डी. पाटील, सामाजिक सचिन ईटकर, पुरस्कार प्राप्त अतिथींनी उपस्थित राहुन हा समारोह यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त केले आणि याचा आपणास मनस्वी आनंद होतो आहे असे त्यांनी सांगितले.
या समारोपीय समारंभात मराठवाड्यातील कृषी, साहित्य, संगीत व युवा या क्षेत्रातील चार गुणवंतांचा यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात जालना येथील विजय अण्णा बोराडे यांना “कृषी”, छत्रपती संभाजी नगर येथील बाबा भांड यांना यांना “साहित्य”, मुंबई (मुळ रा. तेर) येथील पद्मश्री पं. सतीश व्यास यांना “संगीत” तर तुळजापूर येथील लेखक तथा २०२४ चा साहित्य अकादमी युवा पुरस्काराने गौरवलेले देविदास सौदागर यांना “युवागौरव” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या चार ही पुरस्कार मुर्तींचा प्रत्येकी स्मृतीचिन्ह, रोख अकरा हजार रूपये, शाल, पुष्पहार देवून गौरव करण्यात आला. यावेळी विजय अण्णा बोराडे, पं. सतीश व्यास, देविदास सौदागर आणि बाबा भांड यांनी आपल्या सत्काराबध्दल ऋण व्यक्त करणारे मनोगत ही व्यक्त केले.
या तीन दिवसीय समारोहात चित्रकार आणि धान्य रांगोळी प्रदर्शनी भरवणारे प्रल्हाद ठक, अंबाजोगाई येथील हौशी छायाचित्रकारांचा समुह ‘ विहंगम भोवताल’ यांच्या सदस्यांचे पक्षी व फुलपाखरू छायाचित्रांचे प्रदर्शन, गव्हाच्या काड्या पासून रंगीत चित्रांचे प्रदर्शन, पुस्तक विक्री व प्रदर्शन, कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या समारोहस्थळी या वेगवेगळ्या प्रदर्शनी भरवणा-या सर्वांचा समारोह समितीच्या वतीने स्मृती चिन्ह देवून गौरव करण्यात आला.
कै.भगवानरावजी लोमटे यांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या या समारोहाचे महाराष्ट्रभर कौतुक होत आलेले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचलेल्या या समारोहास रसिक श्रोत्यांनी तिन्ही दिवस उपस्थित उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल समारोहाचे सचीव दगडू लोमटे, भगवानराव शिंदे बप्पा, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, सतीश लोमटे व राजपाल लोमटे यांनी रसिक श्रोत्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवर अतिथींचे स्वागत यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे कोषाध्यक्ष सतीश लोमटे यांनी तर पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे स्वागत समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. मेघराज पवळे यांनी मानले.
▪️संगीत, संतूर वादन व शास्त्रीय
गायनाने समारोपाचा समारोप
२५-२६ आणि २७ नोव्हेंबर अशी सलग तीन दिवस चालणाऱ्या या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा समारोप रात्री शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत स्व. पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य पद्मश्री पं. सतीश व्यास यांचे संतूर वादनाने झाला. त्यांना तबल्यावर पं. आदित्य कल्याणपूर यांनी साथ दिली. त्यानंतर कोलकत्ता येथील प्रतिभावान शास्त्रीय संगीत गायक उस्ताद अर्शद अली खान यांचे गायन झाले. त्यांना पुणे येथील प्रसिद्ध तबलावादक प्रशांत पांडव व संवादिनीवर उदय कुलकर्णी पुणे यांनी साथ दिली. या संगीत मैफलीत रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
