*डॉक्टरांच्या समस्यांबाबत डॉक्टरांचा आवाज बनून विधानभवनात काम करणार – पृथ्वीराज साठे*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- केज विधानसभा मतदार संघातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील डॉक्टरांच्या समस्यांबाबत त्यांचा आवाज बनून आपण विधानभवनात काम करणार असल्याची भावना केज विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी व्यक्त केली. ते अंबाजोगाई शहरातील डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आयोजित डॉक्टरांच्या स्नेह मिलन संवाद मेळाव्यात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार संगीता ठोंबरे, राजकिशोर मोदी, डॉ नरेंद्र काळे, बबन लोमटे, डॉ राजेश इंगोले उपस्थित होते.
डॉक्टरांच्या या स्नेह मिलनाचे सोहळ्यात डॉ नरेंद्र काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका विशद केली. ज्यावेळी देशात मेडिकल आपत्ती ओढावली त्यावेळी राष्ट्रवादी डॉक्टर सेल सर्वात पुढे होती याचा अभिमान असल्याचे डॉ काळे यांनी या मेळाव्यात नमूद केले. अंबाजोगाई शहरात शासकीय वैद्यकीय सेवेबरोबरच खाजगी सेवा देखील उत्कृष्ट पध्दतीने देत असल्याचे डॉ काळे यांनी सांगितले. डॉक्टर संरक्षण कायदा प्रथमच काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस शासनाच्या कार्य काळातच अमलात आणला गेला. अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शासनाच्या कार्यकाळातच अस्तित्वात आली आहेत. यापुढील काळात अंबाजोगाई शहरात मेडिकल हब उभारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल प्रयत्नशिल असणार आहे. ३०० च्यावर डॉक्टरांच्या पदोन्नतीसाठी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी आवाज उठवून तो पूर्णत्वाकडे नेला. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत देखील पृथ्वीराज साठे यांच्या पाठीशी आपल्या डॉक्टरांची खंबीरपणे साथ उभा करण्याचे आवाहन डॉ नरेंद्र काळे यांनी या संवाद मेळाव्यात उपस्थित सर्व डॉक्टरांना केले.
डॉक्टरांच्या संवाद मेळाव्यात बबन लोमटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पृथ्वीराज साठे यांच्यामध्ये काम करण्याची सचोटी आहे. तेव्हा शहरातील सर्व डॉक्टरांनी पृथ्वीराज साठे यांना साथ देऊन त्यांना भारी बहुमताने विजयी करण्याचे आवाहन बबन लोमटे यांनी केले. माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी पृथ्वीराज साठे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मतदार संघातील माता भगिनींच्या मूलभूत प्रशांची उकल करण्यासाठी विधान भवनात प्रयत्न करणार असल्याचे अश्वसित केले. काही लोकांच्या दडपणाखाली येऊन ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात रुग्णांची जात, धर्म व गट विचारून त्याच्यावर उपचार केले जातात हे अतिशय निंदनीय बाब असल्याचे माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी नमूद केले.
डॉक्टर संवाद मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की पृथ्वीराज साठे हा एक चळवळीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून सर्वसामान्य मतदारा सोबत डॉक्टरांचे प्रश्न देखील अतिशय उत्तम रित्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतील असा विश्वास राजकिशोर मोदी यांनी उपस्थित सर्व डॉक्टर बांधवाना दिला. केज मतदार संघातील अनेक मतदार त्यांना व्होट सोबत नोट देखील देत आहेत. यावरून साठे यांची लोकप्रियता व विद्यमान आमदार यांच्या विरोधातील चीड दिसून येत आहे.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या अडीच वर्षाच्या अल्पशा कार्यकाळात आपल्या मतदारसंघासोबतच राज्यातील चांगल्या वैद्यकीय शिक्षण तथा वैद्यकीय सेवेसाठी प्रयत्न केले. अंबाजोगाई शहरात मराठवाड्यातील सर्वात मोठी रक्तपेढी मंजूर करून ती कार्यान्वित केली. येथे व्हेंटिलेटर मशीनचा अभाव होता तेव्हा सहा व्हेंटिलेटर स्वा रा ती रुग्णालयात उपलब्ध केले.अनेक डॉक्टरांना कायमस्वरूपी करण्याचे काम आपल्या अल्पशा कार्यकाळातच झाल्याचे अभिमानाने साठे यांनी सांगितले. त्याचबरोबर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मर्यादा ५० वरून १०० वर नेण्यासाठी आपण यशस्वी झाल्याचे सांगताना त्यापुढेही आपण या मतदारसंघातील सर्व ग्रामीण रुग्णालये अत्याधुनिक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन या डॉक्टरांच्या संवाद मेळाव्यात पृथ्वीराज साठे यांनी देतांना आपण ही आपली मतदान रुपी ताकत माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी करण्याची विनंती याप्रसंगी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी उपस्थित सर्व डॉक्टर बांधवाना केली.
डॉक्टरांच्या या संवाद मेळाव्याचे बहारदार सूत्रसंचलन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ राजेश इंगोले यांनी केले. आपल्या सूत्र संचलनात त्यांनी अनेक शेरोशायरीचा आधार घेत डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला . डॉक्टर बांधवांच्या विविध समस्या यापुढील काळात पृथ्वीराज साठे हे विधानभवनात मांडून त्या सोडवतील अशी आशा या मेळाव्याच्या माध्यमातून केली. यासाठी अंबाजोगाई शहरातील सर्व डॉक्टर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील असा शब्द पृथ्वीराज साठे यांना सर्व डॉक्टरांच्या वतीने दिला.या संवाद मेळाव्यास अंबाजोगाई डॉक्टर असोसिएशनचे सर्व डॉक्टर मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.यावेळी संघटनेचा आरोग्य जाहीरनामा महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना देण्यात आला.
