*अलिकडच्या काळातील जातीय संघटना आणि राजकारणातील पत्रकारांचा शिरकाव लोकशाहीला तारक की मारक ठरणार?*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अलीकडच्या काळात बहुसंख्य पत्रकार मित्र हे विविध जातीय संघटनेत सक्रिय सहभाग नोंदवताना, राजकीय पक्षात जाहीर प्रवेश करून उघडपणे प्रचार करताना दिसत असून कालानुरूप होत असलेला बदल पाहता खरोखर राजकारणात चांगच्या विचारसरणीचे पत्रकार आले तर ही गोष्ट लोकशाहीला तारक ठरेल अन्यथा केवळ दिखाउ पत्रकार आले तर ही गोष्ट लोकशाहीला मारक ठरेल व एक दिवस लोकशाही संपुष्टात येण्यास हात भार लागेल.
पत्रकारांच्या लेखणीत एवढी ताकत आहे की तो देशात क्रांती घडवू शकतो, देशाची सत्ता उलथून टाकु शकतो मात्र त्यासाठी तो निस्वार्थी, निर्भीड व निपक्ष असायला हवा त्यामुळेच एक काळ असा होता की त्यावेळी पत्रकारांना ना जात होती ना धर्म होता. पत्रकारांनी कधीही आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाज तोडण्या ऐवजी जोडण्याचेच काम केले आहे आणि त्यामुळेच पत्रकारांना सर्व समाजात, जातीधर्मात सन्मान होता. अलीकडच्या काळात बहुसंख्य पत्रकार हे जातीचे लेबल लावूनच पत्रकारिते मध्ये शिरकाव करीत आहेत आणि असे पत्रकार मित्र हे विविध जातीय संघटनेत सक्रिय सहभाग नोंदवताना दिसतायंत.
प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो आणि तो असायलाही हवा मात्र जातीय संघटनेच्या माध्यमातून समाजाचे ध्रुवीकरण होणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी पत्रकार म्हणून मिरवणाऱ्यांनी घ्यायला हवी.
पूर्वी पत्रकार कोणत्या राजकीय पक्षाला बांधील होता ना कुठल्या विचार धारेला बांधून होता. त्यामुळे त्यावेळची पत्रकारिता ही निरपेक्ष, निर्भीड व निस्वार्थी होती. पत्रकारांच्या लेखणीचा दबदबा होता, राजकीय पक्ष असेल राजकीय नेते असतील सारे जणच पत्रकारांच्या पुढे नतमस्तक होऊन त्यांना सन्मानजन्य वागणूक देत असत, त्याच्या लेखणीची शासन दरबारी दखल घेतल्या जात आसे.
मात्र अलीकडे हे चित्र पालटलेले दिसत आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पत्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा पत्रकारा मुळे एकेकाळी पत्रकारांचा जो दरारा होता तो संपुष्टात आलेला आहे हे वास्तव कोणालाही नाकारून चालत नाही आणि अशाच पद्धतीचे बहुसंख्य पत्रकार आता कोणत्यांना कोणत्या राजकीय पक्षात जाहीर प्रवेश करून उघडपणे प्रचार करताना दिसत आहेत.
कालानुरूप होत असलेला हा बदल असून खरोखरच राजकारणात चांगच्या विचारसरणीचे, विकासाची दृष्टी असलेले पत्रकार आले तर आज जी देशाची वाटचाल विनाशा कडे सुरू आहे ती थांबण्यास खारीचा वाटा लागेल आणि ही गोष्ट लोकशाहीला तारक ठरेल अन्यथा केवळ स्वतःच्या स्वार्था पोटी राजकीय पक्षाचे बटीक बनून दिखाउ पत्रकार राजकारणात आले तर यांना ना देशा विषयी प्रेम राहणार आहे ना समाजा विषयी काही एक देणे राहणार आहे, आणि ही गोष्ट लोकशाहीला निश्चित मारक ठरेल व एक दिवस
लोकशाही संपुष्टात येण्यास हात भार लागेल हे मात्र निश्चित.
