*एम डी एम फॅक्टरचा परिणाम मुंदडा यांच्या उमेदवारी वर होईल का ?* *आ नमिता मुंदडा व मुंदडा परिवार मागील 5 वर्षातील विकास कामाची शिदोरी घेऊन मतदारा पर्यन्त पोचण्याचा करतायंत प्रयत्न*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केज मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजपाच्या आ नमिता मुंदडा व मुंदडा परिवार मागील 5 वर्षात केलेल्या विकास कामाची शिदोरी घेऊन मतदारा पर्यन्त पोचत असल्याने व मतदार संघात तिरंगी लढत होणार हे चित्र आज तरी दिसू लागल्याने एम डी एम फॅक्टरचा परिणाम मुंदडा यांच्या उमेदवारी वर होईल का या कडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुक 2024 च्या केज राखीव विधानसभा मतदार संघातून भाजप महायुतीने विद्यमान आ सौ नमिता अक्षय मुंदडा यांना उमेदवारी दिली असून महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटा कडुन पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते माजी आ पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघातुन निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या माजी आ संगीता ठोंबरे यांनी उमेदवारी साठी सर्व प्रथम भाजपाची व त्या नंतर राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार गटाची दारे ठोठावली. मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना उमेदवारी न मिळाल्याने अखेर त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेऊन आपला उमेदवारी अर्ज धुमधडाक्यात शक्ती प्रदर्शन करत दाखल केला आहे.
निवडणूक रिंगणात उतरलेल्या आ नमिता मुंदडा यांच्या कडे मागील 5 वर्षात केलेल्या विकास कामाची शिदोरी आहे, आ नमिता मुंदडा व अक्षय मुंदडा ही जोडी विकास कामाच्या अनुषंगाने सतत मुंबई मध्ये प्रयत्नशील असते तर आ मुंदडा यांचे सासरे जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा हे ग्राउंड लेवल ला मतदारांच्या जनसंपर्कात राहून त्यांच्या सुख दुःखात सहभागी असतात. अंबाजोगाई, केज मतदार संघात सतत विविध सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन ते जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात.
केज मतदार संघात आ नमिता मुंदडा यांच्या बाजूने सर्व काही जमेची बाजू असताना मागील वर्ष भरा पासून राज्यात गाजत असलेला जरांगे फॅक्टर हा कुठे तरी त्यांना डोकेदुखी ठरतो की काय असं वाटत असतानाच आता तर तीन दिवसा पूर्वी अंतरवली सराटी मध्ये मनोज जरांगे सोबत झालेली दलित व मुस्लिम यांच्या प्रमुख नेत्या सोबतची युती आणि त्यातून निर्माण झालेला (एम डी एम) फॅक्टर चा परिणाम आ नमिता मुंदडा यांच्या उमेदवारी वर होईल का या कडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
