*बिना पुतळ्याचे अंबाजोगाई शहर म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाई शहरानजीकच्या मोरेवाडी चौकात अखेर छत्रपती संभाजी राजेंचा पुतळा बसला*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
बिना पुतळ्याचे शहर म्हणून ज्या अंबाजोगाई शहराची देशाच्या नकाशावर नोंद होती त्या अंबाजोगाई शहरानजीकच्या मोरेवाडी चौकात अखेर विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर छत्रपती संभाजी राजेंचा पुतळा बसवल्या गेला आहे.
सुसंस्कृत व शांतताप्रिय शहर म्हणून ज्या अंबाजोगाई शहराची देशभरात ओळख निर्माण झालेली होती त्या शांतताप्रिय शब्दा मागे कारण होते की शहरात एकाही महापुरुषांचा पुतळा नाही आणि पुतळ्याच्या कारणा मुळे ज्या अन्य शहरात जातीय दंगली होतात त्या कधीच जातीय दंगली अंबाजोगाई शहरात घडल्याचा इतिहास नाही, त्यामुळे पुतळ्याच्या बंदोबस्ताचा पोलिसांवर कधी ताण येण्याचे कारणही घडले नाही. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुण्या गोविंदाने राहतात त्यामुळे बिना पुतळ्याचे शहर म्हणून देशभरात अंबाजोगाईची नोंद झाली होती.
मात्र अंबाजोगाई शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढते आहे, शहरा नजीकची मोरेवाडी, शेपवाडी, चनई, जोगाईवाडी ही गावे आज शहरात मोडू लागली आहेत आणि याच मोरेवाडी मधून लातूर, बीड कडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पाण्याच्या टाकी नजीकच्या नव्याने बनवल्या गेलेल्या छत्रपती संभाजीराजे चौकात या परिसरातील युवकांनी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभा केला असुन रातो रात उभा झालेला हा पुतळा पाहून सर्वत्र एकच विषय चर्चिल्या जात आहे.
