परळी येथील बापुराव आंधळे खून प्रकरणातील सहा आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राज्यभरात गाजलेल्या बापुराव आंधळे खून प्रकरणातील ६ आरोपींचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठातील न्यायमूर्ती एस.जी. मेहरे यांनी मंजूर केला आहे.
या प्रकरणात ग्यानबा उर्फ गोटया गिते यांच्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे परळी शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीने फिर्यादीत म्हटले होते की, दिनांक २९ जून रोजी रात्री ०८.३० वाजणेचे सुमारास आरोपी महादेव गिते यांच्या घरा समोर बापूराव आंधळे यांना पैसे घेण्यासाठी बोलावुन आरोपी शशिकांत उर्फ बबन गिते व इतरांनी कट रचून बापुराव आंधळे याचा गोळया मारुन खुन केला व फिर्यादीवर सुध्दा गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींविरुध्द कलम ३०२, ३०७, १२० (ब), २०१ भारतीय दंड विधान अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयात ६ आरोपीना अटक करण्यात आली होती व त्यांचे जामीन अर्ज सत्र न्यायालय अंबाजोगाई यांनी फेटाळले होते. अटक करण्यात आलेल्या ५ आरोपींनी उच्च न्यायालयात अॅड. सुदर्शन जी. साळुंके यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. अॅड. सुदर्शन साळुंके यांनी माननीय न्यायालयात म्हणणे मांडले की, आरोपींना केवळ राजकीय कारणास्तव अटक करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे की, सरकार पक्षातर्फे आरोपीविरुध्द केलेले आरोप अविश्वसनीय आहेत. अर्जदार आरोपी हे प्रत्यक्ष मारेकरी नाहीत. गुन्हयाचा तपास पुर्ण झालेला असून आरोपी हे जामीनावर सोडण्यास पात्र आहेत
या प्रकरणात आरोपींतर्फे अॅड. सुदर्शन जी. साळुंके व अॅड. पी.पी. मोरे यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील अॅड. ए. बी. गिरासे यांनी काम पाहिले.
