*राज्य शासनाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून श्री योगेश्वरी देवी मंदिरातील विकासकामांसाठी आणखी २ कोटी रुपयांच्या निधी मंजूर*
*आ. नमिता मुंदडांचा पाठपुराव्यामुळे एकूण साडेचार कोटींचा निधी झाला उपलब्ध*
अंबाजोगाई – (प्रतिनिधी)
राज्य शासनाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून श्री योगेश्वरी देवी मंदिर विकासकामांसाठी आणखी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अवघ्या एक महिन्यापूर्वीच राज्य शासनाने या तीर्थक्षेत्रासाठी २ कोटी ६० रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतरही इतर विकासकामांसाठी आ. नमिता मुंदडा यांनी केलेल्या प्रयत्नातून आणखी दोन कोटी असे एकूण साडेचार कोटीं रुपयांच्या निधीतून मंदिर परिसरात विकासकामे करण्यात येणार आहे.
अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी वर्षभर राज्यभरातून भाविकांचा ओघ सुरु असतो. त्यामुळे भाविकांना सोयीसुविधा पुरविण्याच्या दृष्टीने श्री योगेश्वरी मंदिरात पायाभूत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आ. मुंदडा यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला होता. पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी मंदिराची पाहणी देखील केली होती. त्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत श्री योगेश्वरी मंदिर विकासकामांसाठी या वर्षी ऑगस्ट महिन्यात २ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर आ. नमिता मुंदडा यांनी मंदिर परिसरातील अन्य विकासकामे आणि सुशोभीकरणासाठी आणखी २ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे दिला होता. हा वाढीव निधी देखील आता मंजूर झाला असल्याची असल्याची माहिती आ. नमिता मुंदडा यांनी दिली आहे. उपलब्ध झालेल्या एकूण साडेचार कोटी रुपयांच्या निधीतून मंदिर परिसरात सर्व विकासकामे दर्जेदार करून भाविकांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध जरून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आ. मुंदडा यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी झालेल्या २ कोटी ६० लाख रुपये निधीतून विविध कामांची निविदा देखील झाली आहे. लवकरच वाढीव निधीची सुद्धा निविदा प्रक्रिया होणार आहे. यानिमित्ताने मंदिर विकासकामानासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, लोकनेत्या आ. पंकजाताई मुंडे, भाजप नेत्या प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.
