नाटक हा समाज जीवनाचा आरसा असतो, पद्मश्री सतीष आळेकर यांचे मत
स्व.भगवानराव लोमटे स्मृती पुरस्काराने सतीश आळेकर सन्मानीत
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
नाटक हा समाज जीवनाचा आरसा असतो असे मत प्रख्यात नाट्य कलावंत, नाटककार पद्मश्री सतीश आळेकर यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे वतीने देण्यात येणा-या स्व. भगवानराव लोमटे राज्य पुरस्कार स्विकारल्यानंतर आपल्या मनोगतात ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी समाजकारण, साहित्य, संगीत, सांस्कृतिक, सहकार, शिक्षण, नाटक, सिनेमा आदी क्षेत्रात उतुंग कार्य केलेल्या एका मान्यवरास स्व. भगवानरावजी लोमटे यांच्या स्मृतिपित्यर्थ दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा बारावा पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त पद्मश्री सतीश आळेकर, पुणे यांना आज गोवा राज्याचे लोकायुक्त न्या. अंबादास जोशी यांच्या हस्ते व ज्येष्ठ नाट्य कलावंत चंद्रकांत काळे यांच्या विशेष उपस्थितीत प्रदान केला गेला. या वेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण स्मृती चव्हाण स्मृती समारोहाचे सचीव दगडू लोमटे आणि उपाध्यक्ष प्रा. कमलाकर कांबळे हे उपस्थित होते. आपल्या विस्तारीत भाषणात बोलतांना पद्मश्री सतीश आळेकर पुढे म्हणाले की, भगवानराव लोमटे यांनी शिक्षण , राजकारण आणि समाजकारणा सोबत रसिक संस्कृती निर्माण करण्याचं खुप मोठं काम या गावात केलं. यामुळेच या गावात सशक्त रसिक वर्ग निर्माण झाला. यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना मराठी रंगभूमीवर करमणूक कर रद्द केला. आज पर्यंत ही सवलत रंगभूमीवर काम करणाऱ्या सर्वांना मिळते आहे ही फार मोठी गोष्ट आहे. नाटक हे समुहाने सादर केलेलं कृत्य आहे. घटकांनी एकत्रित केलेलं सादरीकरण मिळून नाटक तयार होतं. नाटक हे एकट्याला करता येत नाही. ते नाटकातील वेगवेगळ्या पात्रांना एकत्र येऊन सादर करावं लागतं. त्यामुळे मला मिळालेले सर्व पुरस्कार हे नाटकाला, समुहाला मिळालेले आहेत असे मी मानतो. ज्या ज्या नटांनी, छोट्या मोठ्या भूमिका करणारे कलावंत, नेपथ्य मांडणारे तंत्रज्ञ, त्यांचे सहकारी यांनी गेली पन्नास वर्षे माझी नाटकं घेऊन सर्वत्र प्रवास केला त्या सर्वांच्या कामाला मिळालेला हा पुरस्कार आहे.
नाटक हे समाज जीवनाचा आरसा आहे, नाटकातुन गोष्ट कळत जाते, समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींचं प्रतिबिंब नाटकांमधून उमटते. समाज आणि कला हा संबंध अगदी निकटचा आहे. पण हा संबंध अलिकडे दुरावत चालल्याचे दिसते. रसिकता अजून जास्त नेटाने सशक्त होण्यासाठी नाट्य प्रशिक्षण, नृत्य प्रशिक्षण या सारखे अभ्यासक्रम येथील संस्थांनी चालू केले तर रसिक सशक्त होण्यासाठी मदत होईल असे त्यांनी सांगितले. पद्मश्री सतीश आळेकर यांना हा पुरस्कार न्या.अंबादास जोशी, माजी न्यायमूर्ती हायकोर्ट व लोकायुक्त गोवा राज्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून या पुरस्काराचे स्वरुप स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पहार, रोख पंचवीस हजार रुपये असे आहे. प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना न्या. अंबादास जोशी म्हणाले की, पद्मश्री यांच्या शेजारी बसण्याची ही दुसरी संधी आहे. १९७३ साली वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी मी अंबाजोगाई सोडली. यापुर्वी राजकारणात असून चरितार्थासाठी एखाद्या उद्योग चालवणारा राजकारणी माणूस म्हणून मी भगवानराव लोमटे यांच्या कडे पाहतो. माझा आणि नाटकांचा जास्त संबंध आला नाही. प्रायोगिक नाट्य चळवळीत काम करणारा बंडखोर नाटककार म्हणून सतीष आळेकर यांच्या कडे पाहतो. प्रत्येक पुरस्काराचा एक वजन असतं. पद्मश्री मिळालेल्या एका माणसाने भगवानराव लोमटे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्विकारला यामुळे या पुरस्काराची उंची वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमातील आपल्या मनोगतात बोलताना ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे यांनी सतीश आळेकर यांना मान सन्मान मिळणं हे आता नेहमीचेच झाले आहे. सशक्त कलाकृती निर्माण करणार एक ताकदीचा नाटककार म्हणून आज सतीश आळेकर यांचे नाव आहे. पुर्वीच्या काळी महेश एलकुंचवार आणि सतीश आळेकर या दोन नाटककारांनी अनेक ताकदीची नाटकं निर्माण केले आणि या नाटकात मला काम करण्याची संधी मिळाली यामुळे सतीश यांचा अधिक सहवास मला लाभला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रायोगिक नाटकात काम करणारा कलावंत कधीही स्पर्धेत नसतो, तो सतत आपल्या भुमिकेलला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. मात्र अलिकडे प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकात काम करतांना नवीन कलाकरांची दमछाक होतांना दिसते. ललित कला केंद्रातील सतीश आळेकर यांनी केलेलं काम हे जास्त अधोरेखित करणारे आहे असे ही त्यांनी सांगितले. आपल्या मनोगतात त्यांनी भगवानराव लोमटे यांच्या साहित्य आणि नाट्य क्षेत्रात केलेल्या कामांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे वतीने दगडू लोमटे यांनी स्व. भगवानराव लोमटे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यामागील प्रतिष्ठानची भुमिका जाहीर केली. राजकारण , साहित्य, संगीत आणि सामाजिक कार्यात सहज वावर असणाऱ्या उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांचा ख-या अर्थाने वारसा स्व. भगवानराव बापू लोमटे हे या विभागात चालवत होते. म्हणून त्यांच्या आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जोपासण्यासाठी गेली बारा वर्षांपासून हा राज्यस्तरीय पुरस्कार सातत्याने महाराष्ट्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येतो असे सांगून या वर्षी चा पुरस्कार प्रख्यात नाट्यकर्मी, लेखक सतीश आळेकर यांना गोवा राज्याचे लोकायुक्त न्या. अंबादासराव जोशी आणि प्रसिद्ध नाट्य कलावंत चंद्रकांत काळे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येतो आहे याचा विशेष आनंद स्मृती समितीला होतो आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सतीश आळेकर यांचा परिचय ही सांगितला. कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रमुख अतिथी लोकायुक्त अंबादास जोशी आणि रंगकर्मी चंद्रकांत काळे यांचा परीचय प्रा. कमलाकर कांबळे यांनी करुन दिला. तर सन्मान पत्राचे वाचन वि. वा. गंगणे यांनी केले. आद्यकवी मुकुंदराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्य, सिने, नाट्यप्रेमी व रसिक श्रोता मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. डॉ . मेघराज पवळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्मृती समितीचे दगडू लोमटे, प्राचार्य कमलाकर कांबळे, सतीश लोमटे, राजपाल लोमटे, प्रा. भगवान शिंदे, त्रिंबक पोखरकर, मार्गदर्शक भगवानराव शिंदे यांनी केले आहे
