बस – आयशर टेम्पो यांच्यात अंबड जवळ भीषणअपघात, वाहक बंडू बारगजेसह अन्य पाच प्रवासी जागीच ठार तर 19 जखमी
गेवराई – (प्रतिनिधी ) – अंबड तालुक्यातील मठ तांडा फाट्याजवळ शुक्रवारी सकाळी गेवराई डेपोची बस आणि आयशर टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन यात बसवाहक बंडू बारगजे व अन्य पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे .अनेक जण जखमी झाले आहेत .गेवराई आगाराची गेवराई -जालना ही बस सकाळी आठ वाजता चालक गोरख खेत्रे व वाहक बंडू बारगजे हे जालन्याला घेऊन जात असताना सकाळी साडे आठ नऊच्या सुमारास अंबड जालना रस्त्यावर मठ तांडा शहापूर जवळील वळणावर ठिकाणी एस . टी महामंडळाची गेवराई आगाराची एमएच २० बीएल ३५७३ क्रमांकाची बस आणि मोसंबी फळांनी भरलेला एमएच १ सीआर ९०९९ या क्रमांकाचा आयशर टेम्पो यांच्यात जबरदस्त अपघात होऊन बसमधील ६ जण जागीच ठार आणि १९ प्रवाशी जखमी झाले आहेत . जखमी मध्ये एक ८ वर्षाचा लहान मुलगा असून तोही जखमी झाला आहे . जखमींना उपचारासाठी अंबड ,जालना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे . बसमध्ये २५ – २६ प्रवाशी होते . वाहन चालक गोरख खेत्रे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत . अपघात होताच मठ तांडा येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी मदतकार्य केले . बसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले .ही घटना शुक्रवार दि . २० सप्टेंबर रोजी सकाळी साडे आठ ते नऊच्या दरम्यान घडली . अजूनही या अपघातातील अनेक जखमींची ओळख पटलेली नाही . ओळख पटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे . बंडू बारगजे हे महाराष्ट्र राज्य एस.टी. कर्मचारी संघटनेचे बीड विभागाचे अध्यक्ष होते तसेच ते म . रा .एस.टी. को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक होते . त्यांचा स्पष्टवक्ता व डॅशिंग स्वभाव यामुळे गेवराई शहर व तालुक्यात ते सर्वांना सुपरिचित होते . त्यांचा हा मृत्यू अशा प्रकारे होणे ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे . या घटनेमुळे सकाळपासूनच गेवराई शहर आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .
मयत वाहक बंडू बारगजे
