केज मतदार संघात रा कॉ शरदचंद्र पवार गटाकडुन येणार अनपेक्षित चेहरा गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या सर्वांचाच होणार भ्रमनिरास
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केज मतदार संघाच्या विद्यमान आमदार सौ नमिता मुंदडा यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटा कडुन अनपेक्षित असा अनुभवी तगडा मोहरा मैदानात उतरण्याची तयारी सुरू असल्याने लोकसभा निवडणुकी नंतर गुडघ्याला बाशिंग बांधून आमदारकीचे दिव्य स्वप्न पाहणाऱ्या सर्वांचाच भ्रम निरास होणार आहे.
मागील 30-35 वर्ष आ नमिता मुंदडा यांचे सासरे जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांचा केज मतदार संघात असलेला जनसंपर्क, सर्वांच्या सुखदुःखात असणारा सहभाग या मुळे
केज मतदार संघावर मागील पंचवार्षिकची टर्म वगळता मुंदडा परिवाराचे वर्चस्व राहिलेले असुन स्व. विमलताई मुंदडा यांच्या पश्चात आता त्यांच्या सुनबाई सौ नमिता अक्षय मुंदडा या मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी मध्ये बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विजयी खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांना केज मतदार संघातुन 14 हजार मताधिक्य मिळाल्याने विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडुन निवडणूक लढवण्यासाठी अनेकांच्या अशा पल्लवीत झालेल्या असुन लोकसभा निवडणुकीमध्ये केज मतदार संघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी बजरंग बप्पाना मताधिक्य मिळावे यासाठी अथक परिश्रम घेतले हे संपूर्ण मतदार संघाला ज्ञात आहे. तरीही त्यांना उमेदवारी मिळण्याची आशा मावळत चालली असतानाही पळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या घोड्यावर डाव लावण्या साठी मागील काही महिन्या पासुन अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काडीचेही योगदान नसलेले अनेक हौसे गौसे पक्षाचे नेते मा शरदचंद्र पवार साहेबांची भेट घेऊन येत आहेत, त्यांच्या सोबतचे फोटो व्हायरल करून मलाच उमेदवारी मिळणार या अविर्भावात वावरत आहेत. काहीजण मागे काडीचाही जनाधार नसताना केवळ पैशाच्या ताकतीवर गावोगावी जनसंपर्क करून आमदारकीचे दिव्य स्वप्न पहात आहेत. सरकारी नौकरी करून आयुष्यभर जमा केलेला काळा पैसा बाहेर काढून काही जण आमदारकीच्या रिंगणात उतरू पहात आहेत. पाच वर्षे बिळात राहणारे काही जण मतदार संघात फिरून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून त्या साठी खर्च करून कार्यकर्ते जमवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदारकीचे दिव्य स्वप्न पाहणाऱ्या काहींनी तर गणेशोत्सव काळात विविध स्पर्धा ठेऊन आपण किती सामाजिक उपक्रम राबवतो याचे उत्तम नाटक केले. स्वतःला भावी आमदार म्हणवू पाहणाऱ्या अनेकांची डिजिटल गावागावात चमकू लागली आहेत.
अखिल भारतीय काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाचेही काही जण आमदारकीची स्वप्ने पहात आहेत. मात्र या दोन्ही पक्षाची ताकत या मतदार संघात नगण्य असल्याने काही झालं तरी हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सुटणार असुन पक्षाच्या वतीने आ नमिता मुंदडा यांना शह देण्यासाठी बाहेरून नवीन चेहरा आणण्याच्या तयारीत पक्ष आहे. हा नवीन चेहरा मतदार संघा साठी जरी नवीन असला तरी 3-4 टर्म आमदार राहिलेला आहे, संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे, आर्थिक बाजूने भक्कम आहे. निश्चित तो पवार साहेबांच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतो.
त्या मुळेच केज मतदार संघाच्या विद्यमान आमदार सौ नमिता मुंदडा यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटा कडुन अनपेक्षित असा अनुभवी तगडा मोहरा मैदानात उतरण्याची तयारी सुरू असल्याने लोकसभा निवडणुकी नंतर गुडघ्याला बाशिंग बांधून आमदारकीचे दिव्य स्वप्न पाहणाऱ्या सर्वांचाच भ्रम निरास होणार हे आता निश्चित झाले आहे.
